पटोले यांच्या समर्थनात काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्ली दरबारी, मल्लिकार्जुन खरगे यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 11:09 AM2023-06-08T11:09:17+5:302023-06-08T11:10:48+5:30
खरगे यांनी नागपूरसह विदर्भातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक लक्ष देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
नागपूर : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्यासंदर्भात काँग्रेसमधील एका गटाने पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली होती. यातून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असतानाच बुधवारी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नागपूरसह विदर्भातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. पटोले यांच्या नेतृत्वात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसह विधान परिषद निवडणुकीत पक्षाला विजय मिळाल्याचे शिष्टमंडळाने खरगे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा अहवाल याप्रसंगी सादर करण्यात आला.
काँग्रेसचे सध्याचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे कर्नाटकमध्ये कॅबिनेट मंत्री बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी लवकरच नवा प्रभारी नेमला जावा, विदर्भात काँग्रेसला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळू शकतात. यादृष्टीने मोर्चेबांधणी संदर्भात शिष्टमंडळाने चर्चा केली. तसेच कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या दमदार यशाबद्दल खरगे यांचे अभिनंदन केल्याची माहिती शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी दिली.
खरगे यांनी नागपूरसह विदर्भातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक लक्ष देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिष्टमंडळात विकास ठाकरे, धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, संजय राठोड, अनिस अहमद, उमेश डांगे, अतुल कोटेचा, श्याम उमाळकर, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, गज्जू यादव, आकाश जाधव, तेजेंद्र चव्हाण, किशोर बोरकर आदींचा समावेश होता.