लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांचे नाव स्कॉलर जीपीएस या नामांकित यादीत ०.०५ टक्के मधील जगभरातील वैज्ञानिकांमध्ये संलग्नित झाले आहे. डॉ. संजय ढोबळे यांच्या संशोधनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान प्राप्त झाला आहे.
जगभरातील १७७ शाखा व १४ विभिन्न विषयातील ३,५०,००० मुख्य वैज्ञानिकांच्या ०.०५ टक्के यादीमध्ये नाव आल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला जगाच्या पटलावर नेण्यात डॉ. संजय ढोबळे यांना यश प्राप्त झाले आहे. त्यांचे संशोधन कार्य ल्युमिनिसेन्स मटेरियलवर असून या विषयात जगातील १७ वैज्ञानिकांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ते ५ व्या क्रमांकावर असून भारतातील ते एकमेव वैज्ञानिक आहे. याचबरोबर भौतिकशास्त्र या विषयात ९,९५,७९१ वैज्ञानिकांचा समावेश असून जगातील या यादीमध्ये १९८१ या क्रमांकावर असून ते ०.२ टक्के संशोधकांमध्ये त्यांचे नाव आहे. जीवनभरातील संशोधन कार्य करून संशोधनाच्या सर्व निकषांमध्ये एकंदरीत ०.०५ टक्के यामध्ये डॉ. संजय ढोबळे यांचा समावेश आहे.संशोधकांच्या ०.०५ टक्के यादीमध्ये समावेश झाल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
- सलग चौथ्यांदा २ टक्के यादीमध्ये समावेशयापूर्वी स्टॅन्डफोर्ड विद्यापीठाने सलग २०२०, २०२१, २०२२ व २०२३ मध्ये प्रकाशित केलेल्या जागतिक स्तरावरील दोन टक्के वैज्ञानिकांच्या यादीमध्ये डॉ. संजय ढोबळे यांचे नाव होते. त्यांचे आतापर्यंत ९२४ संशोधन निबंध स्कोपस वर प्रकाशित असून एकूण त्यांच्या नावे ६३ पेटंट आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ३० पुस्तकांमध्ये लेखन केले आहे.