नागपूर : लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट व्यवहार केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारे बल्लारपूर येथील ॲड. राम खोब्रागडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दुसऱ्यांदा दणका दिला.
खोब्रागडे यांनी सुरुवातीला या मागणीसह रिट याचिका दाखल केली होती. ६ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्या न्यायपीठाने ही मागणी निवडणूक याचिकेमध्ये केली जाऊ शकते, असे स्पष्ट करून ती रिट याचिका फेटाळली होती, तसेच खोब्रागडे यांच्यावर एक हजार रुपये दावा खर्च बसवला होता. त्यानंतर खोब्रागडे यांनी न्यायालयाने या निर्णयावर पुनर्विचार करावा, याकरिता अर्ज दाखल केला होता. तो अर्जही शुक्रवारी खारीज करण्यात आला व खोब्रागडे यांच्यावर ५०० रुपये दावा खर्चदेखील बसविण्यात आला.
ही रक्कम चार आठवड्यांत विधिसेवा उप-समितीच्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. भ्रष्ट व्यवहार सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करावे लागतात. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ही कार्यवाही केवळ निवडणूक याचिकेंतर्गत करता येते. याकरिता रिट याचिका दाखल केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.