नागपूर: सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते देशासाठी व्यवस्था उभी करतात. संपूर्ण देशाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. हा विभाग देश उभारणीसाठी मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनानिमित्त राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०२३-२४ वितरण सोहळा रविवारी सुरेश भट सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटनकर-म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, सचिव सतीश कोळीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, पायाभूत विकास महामंडळ सचिव विकास रामगुडे, सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे अभियंते, वास्तुशास्त्रज्ञ, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा कुटुंबियांसह सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कारही वितरीत करण्यात आले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पाची माहिती देणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक दिनेश नंदनवार यांनी केले. संचालन आसावरी गलांडे-देशपांडे यांनी केले तर जनार्दन भानुसे यांनी आभार मानले.
- गडकरी हे ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ असा उल्लेख करताना त्यांच्या या विभागातील कार्याचा गौरव केला. तसेच मनिषा पाटणकर- म्हैसकर यांनी हा कार्यक्रम पहिल्यांदाच विदर्भ-नागपुरात होत असल्यामुळे शासनाचे विदर्भावरील प्रेम व आदर दिसून येत असल्याचे सांगितले.उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कारउत्कृष्ट पूल - अंभोरा येथील वैनगंगा नदीवरील अत्याधुनिक पूलउत्कृष्ट इमारत – बोरीबंदर येथील उत्पादन शुल्क विभाग मुख्यालय इमारतउत्कृष्ट रस्ता – पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग