कमलेश वानखेडे
नागपूर : संसदेत, तसेच विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंगळवारी लोकसभेत सादर झाले. यामुळे महिलांचा राजकारणातील टक्का वाढेल. मात्र, महिला आरक्षण लागू नसतानाही नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांनी महिला नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. १९५२ च्या पहिल्याच निवडणुकीत नागपुरातून अनसूयाबाई काळे यांनी विजयी होत पाया रचला, तर १९९८ मध्ये रामटेक मतदारसंघातून राणी चित्रलेखा भोसले यांनी लोकसभा गाठत कळस चढविला. विशेष म्हणजे या दोन्ही महिलांना नेत्यांना काँग्रेसने संधी दिली होती.
स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नागपुरात अनेक राजकीय दिग्गज सक्रिय होते; पण असे असतानाही काँग्रेसने अनसूयाबाई काळे यांना संधी दिली. त्यांचा एकतर्फी विजय झाला. नागपूरच्या पहिल्या खासदार व पहिल्या महिला खासदार होण्याचा मानही त्यांना मिळाला. काळे यांनी पुढील पाच वर्षांत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची पावती त्यांना मिळाली. १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा त्यांनाच नागपूरची उमेदवारी दिली. त्यांनी ४६.८३ टक्के मतांसह सलग दुसऱ्यांदा विजय मिळवीत महिलाशक्तीचा परिचय करून दिला.
१९९८ मध्ये बाराव्या लोकसभेसाठी काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदारसंघात राणी चित्रलेखा भोसले यांच्यावर विश्वास टाकला. त्या ६० हजार ३८ मतांनी विजयी होत लोकसभेत पोहोचल्या. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे अशोक गुजर आणि बसपाचे माजी खा. राम हेडाऊ मैदानात होते. राणी चित्रलेखा भोसले यांना ३ लाख २५ हजार ८८५ मते मिळाली, तर अशोक गुजर यांना २ लाख ५८ हजार ८४० मते मिळाली होती. या विजयाने रामटेकच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मानही राणी चित्रलेखा भोसले यांना मिळाला.
कुंदाताई विजयकर यांच्यासह नागपूरने दिल्या सात महिला महापौर
- नागपूर महापालिकेत आजवर सात महिला महौपार झाल्या आहेत. यातील सहावेळा केवळ महिला आरक्षणामुळे महिलांना संधी मिळाली आहे. फेब्रुवारी १९९६ मध्ये काँग्रेसकडून विजयी झालेल्या कुंदाताई विजयकर या ३९ व्या महापौर झाल्या. नागपूरच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर फेब्रुवारी १९९९ मध्ये भाजपच्या डॉ. कल्पना पांडे, मार्च २००० मध्ये वसंंधरा मासुरकर, मार्च २००१ मध्ये भाजपच्या पुष्पा घोडे, जुलै २००७ मध्ये भाजपच्या मायाताई इवनाते, डिसेंबर २००९ मध्ये अर्चना डेहनकर व त्यानंतर २०१७ मध्ये भाजपच्या नंदा जिचकार या महापौर झाल्या आहेत. मायाताई इवनाते या महिला राखीव जागेवर महापौर झाल्या नव्हत्या. तर २००७ मध्ये महापौर देवराव उमरेडकर यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर सहा महिन्यांतच त्यांचे पद गेले. त्यांच्या जागेवर इवनाते यांना महापौरपदाची संधी मिळाली होती.
सुनीता गावंडे काँग्रेसच्या एकमेव महिला जिल्हाध्यक्ष
- नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या एकमेव महिला जिल्हाध्यक्ष होण्याचा मान सुनीता गावंडे यांना मिळाला आहे. गावंडे या २००२ मध्ये सोनेगाव-निपाणी (नागपूर ग्रामीण) मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाल्या. त्याच वेळी त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही झाल्या. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर २००५ मध्ये त्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष झाल्या व पक्षसंघटनेची सूत्रे महिला नेतृत्वाच्या हाती आली. पुढे तब्बल ११ वर्षे त्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिल्या.