नागपूर : गत २४ तासांत नागपूरचे किमान तापमान १.६ अंशाने वाढून रविवारी ११ अंशावर पाेहोचले. बदलत्या वातावरणीय परिस्थितीमुळे रात्रीचा पारा काही अंशी चढला असला तरी गारठा मात्र कायम आहे. पारा अद्याप सरासरीच्या खाली असल्याने तीव्र थंडीची जाणीव नागपूरकरांना आजही हाेत आहे.
महिनाभरात जवळजवळ गायब झालेली थंडी फेब्रुवारी सुरू हाेताच पुन्हा परतली. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे मध्य भारतात गारवा वाढला. त्याचा प्रभाव विदर्भावरही दिसून येत आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तीन दिवसांत पारा खाली घसरला. सर्व जिल्ह्यांत किमान तापमान सरासरीच्या खाली असून, रविवारी १०.५ अंशासह गाेंदिया सर्वांत थंड शहर ठरले. नागपूरमध्ये पारा सरासरीपेक्षा ३.४ अंशाने खाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीची जाणीव हाेत आहे. दिवसाचे तापमान मात्र सातत्याने वाढत आहे. रविवारी ३२ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा १.७ अंशाने अधिक आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मात्र, सायंकाळ हाेता हाेता वातावरणात गारवा येताे. रात्री पुन्हा गारठा वाढताे आणि पहाटे हुडहुडी भरते. त्यामुळे उन्हाळा, हिवाळा, अशा दाेन्ही ऋतूंचा अनुभव नागपूरकरांना मिळत आहे. तसा फेब्रुवारी महिन्यात असा अनुभव नेहमीच येत असताे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यापुढे पारा वाढण्यास सुरुवात हाेईल. २४ तास वातावरणाची परिस्थिती अशीच राहील; पण ७ फेब्रुवारीपासून रात्रीचे तापमान पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.