मुंबई - एकीकडे महाराष्ट्र १ ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न पाहात आहे. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य होणार असल्याचं राज्याच्या प्रमुखांकडून सांगण्यात येतं. मात्र, दुसरीकडे आजही कुपोषणामुळे शेकडो बालकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. कुपोषणाच्या गंभीर समस्येवर शासनस्तरावरून सातत्याने उपाययोजना सुरू असतात. मात्र, अद्यापही कुपोषणाचा नायनाट करण्यात सरकारला अपयश आलं आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिक शहरात सप्टेंबर महिन्यात कुपोषणामुळे दोन महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर, मेळाघाट आणि आदिवासी भागातील बालकांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे. त्यामुळे, शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे आणि योग्य ती उपाययोजन करणे गरजेचे आहे. त्यातच, ऑक्टोबर महिन्यात कुपोषणामुळे राज्यात तब्बल ८५२ बालमृत्यूंची नोंद झाल्याचं वाचण्यात आलं, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सकारचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यातील अनेक प्रश्नांकडे विरोध लक्ष वेधत आहेत. आज जयंत पाटील यांनी कुपोषणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
''राज्यात ऑक्टोबर महिन्यात कुपोषणामुळे तब्बल ८५२ बालमृत्यूंची नोंद झाल्याची बाब वाचनात आली. ही बाब फार चिंताजनक आहे. राज्यकर्त्यांना आकड्यांची जुळवाजुळव आणि पत्रप्रपंचातून वेळ मिळाला तर त्यांनी या परिस्थितीकडे लक्ष द्यावे. महागाई व अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधा हेच या सर्वांचे मूळ आहे,'' असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, सरकारनं तातडीने यावर उपाययोजना राबवून अंमलबजावणी करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरुन आणि त्यांच्या भूमिकेवरुन रणकंदन होताना दिसत आहे. राज्यातील मूळ प्रश्न बाजुला राहून आरोप-प्रत्यारोपांवर चर्चा होऊन एकमेकांवर टीका-टीपण्णीच होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे, जनतेच्या प्रश्नांबाबत खरंच सत्ताधारी आणि विरोधकही गंभीर आहेत की नाहीत, हाही खरा प्रश्न आहे.