कुही (नागपूर) : जीएसटी अधिकारी असल्याचा बनाव करत दोन तोतयांनी मांढळ येथील व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला आणि पसार झाले. संशय बळावल्यावर चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्यांना कळले आणि सगळ्यांनी डोक्यावर हात मारले.
मंगळवारी दुपारी १ ते ४ वाजताच्या दरम्यान दोन तोतयांनी जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत मांढळ येथील अनेक दुकानात व्यवसाय व विक्री कराचा भरणा केला की नाही, अशी विचारणा करत दंडाची वसुली केली. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व बुद्धे कृषी केंद्राचे मालक राजीव बुद्धे यांच्याकडेही त्यांनी विचारणा केली. बुद्धे यांनी आमच्या गावचेच व्यक्ती जीएसटीमध्ये मुख्य पदावर कार्यरत असल्याचे सांगताच, तोतयांनी काढता पाय घेतला. चहा-पाण्याखातर पाचशे रुपये मात्र ते घेऊन गेले.
या घटनेची वाच्यता गावात होईपर्यंत, त्या दोन्ही तोतयांनी विकास इलेक्ट्रिकलचे प्रकाश भोयर, धनराज वैद्य, नळी फिटिंगच्या साहित्याच्या दुकानाचे झुरमुरे, महाजन कृषी केंद्राचे अजय निरगुलकर, अजय महाजन, धीरज जीवनकर, अमोल साेनकुसरे यांच्यासह मांढळ येथील किराणा दुकानदार, कापड दुकानदार आदींकडून हजारो रुपयांची अवैध दंड वसुली केली. शिवाय, दुकानांतून आवश्यक वस्तूही फुकटात घेऊन गेले.
एक जीएसटी कार्यालयातलाच कर्मचारी!
- काही दुकानदारांनी त्यांची ओळख मागितली असता, त्यांनी राऊत व रामटेके अशी नावे सांगितली. मोबाइल नंबरही दिला. मोबाइलच्या कॉलरआयडीवर तपासला असता, एका संस्थेचे नाव त्यात येत होते. काही जागरूक नागरिकांनी तपास केला असता, ‘रामटेके’ नाव असलेली व्यक्ती व्यवसाय व विक्री कर विभाग कार्यालय, नागपूर येथे कार्यरत असून, तो महिन्याभरापासून आजारी रजेवर असल्याचे कळले.
जीएसटी कार्यालय खडबडून झाले जागे
- दरम्यान, काही नागरिकांनी नागपूर येथील व्यवसाय व विक्रीकर खात्यात संपर्क साधला आणि झालेल्या प्रकाराची माहिती दिली असता, अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी ताबडतोब खात्यातील काही अधिकाऱ्यांना पाठवून फसवणूक झालेल्या दुकानदारांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांचे बयाण नोंदवून तोतया अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.