नागपूर : गुंतवणुकीच्या नावाखाली उद्योग क्षेत्रात नेहमी चर्चेत असणाऱ्या तिघांनी एका व्यावसायिकाला १.३० कोटींचा गंडा घातला. प्रसिद्ध व्यावसायिक एन. कुमार यांच्या मुलाची या प्रकरणात फसवणूक झाली असून, पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण ‘हायप्रोफाइल’ असल्याने मागील अनेक दिवसांपासून याला दाबण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनिल हरचंदानी हे फसवणूक झालेले व्यावसायिक असून, प्रकाश राव (वय ६६. गोकुलधाम, कामठी मार्ग), संदीप इंद्रजित सुरी (४९,कान्हा रीजन्सी, काटोल रोड) आणि रिपुदमन सिंग-ओबेरॉय (४२,गुरुनानक पुरा, कामठी) अशी आरोपींची नावे आहेत. हरचंदानी हे खासगी कंपनीचे संचालक असून, २०१०-११ च्या सुमारास ते गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत होते. सीए सीतारामन अय्यरने काही खासगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास खूप नफा मिळेल, असे सांगितले व आरोपी प्रकाश रावशी हरचंदानी यांची भेट घालून दिली. आपली एका मोठ्या कंपनीत भागीदारी असून, गुंतवणूक केल्यास निश्चित किमान ३० टक्के नफा मिळेल, असा दावा रावने केला.
अय्यरच्या सांगण्यावरून हरचंदानी यांनी २०११ मध्ये आरोपींच्या संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. २०११ ते २०१३ या कालावधीत हरचंदानी यांनी १.३१ कोटींची गुंतवणूक केली. गुंतवणुकीची रक्कम नफ्यासह परत न केल्यास संबंधित कंपनीचे शेअर्स त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचे आश्वासन आरोपींनी हरचंदानी यांना दिले होते. २०१३ मध्ये हरचंदानी यांना पैशांची गरज होती. त्यांनी मूळ गुंतवणूक आणि नफा अय्यर व राव यांना मागण्यास सुरुवात केली. मात्र, रावने पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. दरवेळी तो वेगवेगळी कारणे द्यायचा. हरचंदानी यांनी चौकशी केली असता आरोपींनी गुंतवणुकीच्या नावाखाली इतर लोकांकडून मोठी रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. राव यांनी आत्महत्येची धमकी देत ओबेरॉय पैसे परत करेल असे सांगितले. या कालावधीत रावने आपली कंपनी दुसऱ्या उद्योजकाला विकली. हरचंदानी यांनी रावच्या कंपनीच्या खरेदीदाराशी संपर्क साधला. त्यानेदेखील पैसे परत करण्याचे केवळ आश्वासनच दिले. या प्रकरणात खूप जास्त मनस्ताप झाल्यावर अखेर हरचंदानी यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेने याची प्राथमिक चौकशी केली व अखेर या पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची हमीपत्रे अय्यरकडे
२०११ ते २०१३ या कालावधीत हरचंदानी यांनी ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यात नांदेड येथील ऑरोलम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, नागपुरातील ऑरबिंदो टी अँड एम इंडस्ट्रीज, मॉडर्न ॲग्रोबार्ड्स प्रा. लि. व नागपूर चिप बोर्ड प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश होता. हरचंदानी यांनी अय्यरच्या माध्यमातून ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, त्या त्यांच्या संचालकांच्या स्वाक्षरी असलेली हमीपत्रे देत असत. ती हमीपत्रे अय्यरकडेच होती. हरचंदानी यांनी दस्तावेज मागितल्यावर अय्यरने काही हमीपत्रे आणि कोरे शेअर ट्रान्सफर फॉर्म दिले. शेअर ट्रान्सफर फॉर्मवर संदीप सुरी, रिपुदमन सिंग-ओबेरॉय, प्रकाश राव आणि रामप्रसाद यांची स्वाक्षरी होती.
कठोर कारवाईची कधी होणार ?
संदीप सुरी हा प्रॉपर्टी डीलर आणि सरकारी कंत्राटदार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्याविरोधात अन्य एका वकिलासह इतर लोकांकडून तक्रारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. ओबेरॉय हा एका सीएचा मुलगा आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी भूमिगत झाले. हरचंदानी यांनी गुंतविलेली रक्कम नफ्यासह सुमारे सात कोटींवर झाली आहे. या प्रकरणात कारवाई होऊ नये यासाठी आरोपी प्रयत्नशील होते. मात्र, आता आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.