नागपूर : ६० लाखांचे सोने आणि १३ लाखांची रोख रक्कम पळविलेल्या शांतीनगर येथील घरफोडीचा उलगडा गुन्हे शाखेने २४ तासात केला. या घरफोडीत तक्रारकर्त्याचा मुलगा आणि दुकानात काम करणारा नोकरच आरोपी निघाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चोरी केलेली रक्कम घेऊन आरोपी सौदी अरेबियात पळून जाणार होता, असे तपासात पुढे आले आहे.
जाफर जावेद थारा (२८, कश्यप ले-आउट, महेशनगर) आणि वाजीद गफुर अली (२७, गांजा खेत चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जावेद अब्दुल रज्जाक थारा (५६, प्लॉट नं. एच-३, महेशनगर, कश्यप कॉलनी) हे रविवारी आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह कामठी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून त्यातील ५०० रुपयांचे २६ बंडल असे १३ लाख रुपये आणि सोन्याचे दीड किलो वजनाचे दागिने किंमत ६० लाख रुपये असा एकूण ७३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्यामुळे खळबळ उडाली होती.
इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून चोरट्यांनी रक्कम, दागिने पळविल्यामुळे लॉकरचा कोड माहिती असणाऱ्यानेच ही चोरी केली असावी, अशी दाट शंका गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आली. त्यानुसार त्यांनी जावेद अब्दुल रज्जाक थारा यांच्या दुकानात काम करणारा कामगार आरोपी वाजीद गफुर अली यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने जाफरने पैशांची पिशवी आपणास आणून दिल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितले. त्याच्या बयाणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जाफर जावेद थारा यास अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माधुरी नेरकर, सहायक पोलीस निरीक्षक पवन मोरे, उपनिरीक्षक बलराम झाडोकर, हवालदार अनिल जैन, दशरथ मिश्रा ईश्वर खोरडे, विजय श्रीवास, रवींद्र करदाते, संतोष चौधरी, दीपक लाखडे, शेख फिरोज, अनिल बोटरे आणि सायबर सेलच्या पथकाने केली.
शेअर मार्केट ट्रेडिंगचा नाद नडला
घटनेतील तक्रारकर्ते जावेद अब्दुल रज्जाक थारा यांचा मुलगा जाफरचे कुटुंबीयांशी पटत नव्हते. ते एकाच घरात राहत होते. जाफरला शेअर मार्केट ट्रेडिंगचा नाद होता. यातूनच त्याने आपल्या घरात चोरी करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीय कामठी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेल्याची संधी साधून जाफरने घरातील आलमारीत असलेल्या कपाटातील इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून ६० लाखांचे दागिने आणि १३ लाख रुपये असा ७३ लाखांचा मुद्देमाल चोरी केला. या कामात त्याने दुकानात काम करणाऱ्या वाजीद गफुर अलीची मदत घेतली. हे पैसे घेऊन जाफर सौदी अरेबियात पळून जाणार होता, अशी माहिती आहे.
............