नागपूर : ‘सीबीआय’च्या ‘एसीबी’ने (ॲन्टी करप्शन ब्युरो) ‘सीजीएसटी’चे सहआयुक्त तसेच शहरातील एका चार्टर्ड अकाऊन्टंटला चार लाखांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतले. मुकूल आयुक्त असे सहआयुक्तांचे नाव असून ‘व्ही.आर.इनामदार ॲन्ड कं.’चे हेमंत राजंदेकर या चार्टर्ड अकाऊन्टंटसह ते ‘सीबीआय’च्या जाळ्यात अडकले. यवतमाळमधील एका कंत्राटदाराच्या तक्रारीनंतर हा सापळा रचण्यात आला. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील जय इलेक्ट्रीकल्स ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्सचे जयंत लक्ष्मीकात चौपाणे हे कंत्राटदार आहेत. मुकूल पाटील यांनी तक्रारदाराच्या नावाने सेवा कर दायित्वाशी संबंधित कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांना साडेचार लाख रुपयांची मागणी करण्यात आली. कंत्राटदाराने बरीच विनंती केल्यावर चार लाखात सौदा निश्चित झाला. दरम्यान, चौपाणे यांनी यासंदर्भात थेट ‘सीबीआय’कडे तक्रार केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर ‘सीबीआय’च्या ‘एसीबी’ने सापळा रचला व त्यानुसार तक्रारकर्ते चार लाख रुपये घेऊन दोघांकडे गेले. चार लाख रुपयांची लाच स्विकारताना त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या दोघांचीही चौकशी सुरू असून त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती ‘सीबीआय’च्या ‘एसीबी’चे वरिष्ठ अधिक्षक एम.एस.खान यांनी दिली.
घर-कार्यालयाची झडती
या कारवाईमुळे शहरातील ‘सीए’ वर्तुळ तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ‘सीबीआय’च्या पथकाकडून हेमंत राजंदेकर यांचे अजनी चौकातील कार्यालय तसेच मुकूल पाटील यांच्या निवासस्थानीदेखील झडती घेण्यात आली.