निशांत वानखेडे
नागपूर : मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. या सात जिल्ह्यांना २०५० ते २०८०पर्यंत अत्याधिक तापमान आणि अत्याधिक पावसाचा सामना करावा लागेल.
जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर एकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, बोन, जर्मनीच्या वतीने येथील पोट्सडेम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने ‘नासा’च्या उपग्रहीय साधनांच्या आधारे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या सात जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. सरासरी पाऊस, पावसाचे चक्र, अति पावसाची वारंवारता, सरासरी तापमान, अत्यंत उष्ण दिवस आणि काेरडे दिवस या सात निकषांवर अभ्यास करून २०३०, २०५० आणि २०८० साली या जिल्ह्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावण्यात आला आहे. यासाठी हवामानाच्या ८ ते ९ माॅडेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी याबाबत माहिती दिली.
सात जिल्ह्यांत पावसाची स्थिती
- सरासरी पावसात २०३० ते २०५०पर्यंत १५ ते २० टक्के आणि २०५० ते २०८०पर्यंत २३ ते ३७ टक्के वाढ हाेईल.
- पावसाची तीव्रता २०५०पर्यंत ७ ते ११ मि. मी. आणि २०८०पर्यंत ८ ते १३ मि. मी.पर्यंत वाढेल.
- अति पावसाचे दिवस २०५०पर्यंत २५ ते ३० दिवस आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.
- अत्याधिक पावसाची वारंवारता १ दिवस आणि ३ दिवसांपर्यंत वाढेल.
- अत्याधिक पावसाची तीव्रता २०५०पर्यंत १५, १८ ते २० टक्के आणि २०८०पर्यंत १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल.
तापमानाची स्थिती काय राहील?
- २०३० ते २०५०पर्यंत १.५ अंश आणि २०५० ते २०८०पर्यंत २.७ अंशापर्यंत वाढलेले असेल.
- अति तापमानाचे २०५०पर्यंत २५ ते ३० आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.
- अत्याधिक काेरडे दिवस २०३० ते २०५०पर्यंत २ ते ३ आणि २०५० ते २०८०पर्यंत ४ ते ६ दिवस वाढतील.
- अमरावती आणि यवतमाळमध्ये ही तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज
अभ्यासाची आकडेवारी धक्कादायक आहे. प्रत्यक्ष त्याकाळात याची जाणीव तीव्र आणि असहनीय ठरेल. संस्थेने संबंधित जिल्ह्यांचा अभ्यास केला असला, तरी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत ही स्थिती निर्माण हाेईल. त्यामुळे हरित वायू आणि एकूणच प्रदूषणावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे.
- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक