नागपूर : अयोध्येत श्रीराममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळा पार पडला आणि नागपुरात मनामनात आणि वाणीवाणीवर रामाचेच नाव होते. कुठे रॅली, कुठे महाआरती, कुठे भजन तर कुठे किर्तन या वातावरणात संपूर्ण संत्रानगरी अक्षरश: रामनामात रंगून गेली. हजारो कंठातून रामस्तुतीचा गजर निनादला अन अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आनंदाश्रू अनेकांच्या डोळ्यातून बाहेर पडले. सायंकाळच्या वेळी तर नागपुरने अक्षरश: दिवाळी अनुभवली आणि दिव्यांच्या प्रकाशात अनेक मंदिरे व घर उजळून निघाली.
नागपुरात सोमावारी सकाळपासूनच भगवामय वातावरण होते. जागोजागी झेंडे, रामप्रतिमा, रामभजन असेच वातावरण होते. एवढेच नव्हे तर कुठे पेढे, कुठे लाडू तर कुठे महाप्रसाद वाटपाने श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापनेचा आनंद साजरा केला. शहरातील सर्वच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तो एक क्षण अन चौकाचौकांत जय श्रीरामचा जयघोषमूर्ती प्राणप्रतिष्ठेचा क्षण जसा जसा जवळ येऊ लागला तशीतशी भाविकांमधली उत्कंठा शिगेला पोहोचली होती. ढोलताशे, घंटा, शंखनादाचा स्वर निनादला. घोषणांच्या सातत्यपूर्ण जयघोषात रामलल्लाची मूर्ती पडद्यावर दिसताक्षणी हजारो कंठांमधून एकाच वेळी 'जय श्रीराम' चा चौकाचौकात व घराघरांमध्ये जयघोष झाला.
मिरवणूकांनी प्रफुल्लित झाले वातावरणपारंपारिक वेश परिधान करून आलेल्या हजारो भाविकांनी शहराच्या विविध भागातून मिरवणूका काढल्या. भेंडे ले आऊट, जयबद्रीनाथ सोसायटीत सकाळी व सायंकाळी आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या, भगवे झेंडे झेंडूच्या माळांसह भाविकांच्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी वातावरण प्रफुल्लित झाले होते.
दिवाळीचा माहोल; फटाके फुटलेसायंकाळच्या वेळी शहरातील प्रमुख चौकांमध्ये आतषबाजी करण्यात आली. धरमपेठेतील लक्ष्मीभुवन चौक, बडकस चौक, सक्करदरा, प्रतापनगर चौक, भेंडे ले आऊट, खामला चौक, लक्ष्मीनगर चौक, आठरस्ता चौक इत्यादी ठिकाणी जोरदार फटाके फोडण्यात आले. लक्ष्मीभुवन चौकात तर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.
जानेवारीत नागपुरने अनुभवला गुढीपाडवा अन दिवाळी- सकाळच्या वेळी घरोघरी सडा, रांगोळी सुरू होते- सकाळी बऱ्याच घरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.- दुपारपासूनच विविध भागात फटाक्यांची आतषबाजी सुरू- शहरातील चौक, घरे भगवेमय झाले होते- मुख्य रस्त्यांसोबतच वस्त्यांमध्ये आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या.- सर्वच भागामध्ये सार्वजनिकपणे स्क्रीन लावून अयोध्येचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण.- मोटारसायकल रॅली काढून तरुणांनी दाखविला उत्साह- घरे, इमारती, प्रतिष्ठानांवर विद्युत दिव्यांच्या रोषणाई- शहरातील बहुतांश मंदिरांमध्ये सायंकाळीदेखील भजन, किर्तनाचे कार्यक्रम- मुख्य चौक, वस्त्यांमध्ये महाप्रसादाचे वाटप