नागपूर : वातावरणातील बदलांमुळे सर्वत्र सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत असताना कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने दुसऱ्यांदा शंभरी गाठल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी १३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ७९ हजार ४७१ झाली असून, मृतांची संख्या १० हजार ३३९ वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात २४ तासांत १ हजार ८८१ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत शहरात ८२ तर, ग्रामीणमध्ये ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर ७.२ टक्क्यांवर गेला आहे. शहरात रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ७१३, ग्रामीणमध्ये १ लाख ६८ हजार ७६२ तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ९ हजार ९९६ झाली आहे. विशेष म्हणजे, २ जुलै रोजी ९५, ३ जुलै रोजी १०५ तर मंगळवारी १३५ रुग्णांची नोंद झाली. शहरासोबत ग्रामीणमध्येही रुग्ण वाढताना दिसून येत आहे.
-कोरोनाचे १५ रुग्ण भरती
कोरोनाचे शहरात १८३, ग्रामीणमध्ये ३९८ असे एकूण ५८१ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील ५६६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ८ रुग्ण मेडिकलमध्ये, १ रुग्ण मेयोमध्ये, तर ६ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी शहरातील ८२, ग्रामीण भागातील ५३ असे १३५ रुग्ण बरे झाले. कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.१४ टक्के आहे. आतापर्यंत ५ लाख ६८ हजार ५५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.