नागपूर : पंधरा दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने गुरुवारपासून दिलासादायक हजेरी लावली. विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार बरसला तर काही भागांत रिपरिप सुरू आहे. मात्र, परतलेल्या पावसाने सर्वच जिल्ह्यांना थाेडेफार भिजवले. मात्र, हा मुक्काम दाेनच दिवसांचा असल्याचा अंदाज आहे.
परतलेल्या पावसाने भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यांत जाेरदार बॅटिंग केली. शुक्रवार सकाळपर्यंत भंडारा शहरात सर्वाधिक १२० मि. मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर तालुक्यांतही पाऊस चांगला बरसला. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरीमध्ये १०२ मि. मी. पाऊस झाला. चंद्रपूरसह इतर भागातही रिमझिम सुरू हाेती. गडचिराेलीमध्ये गुरुवारी रात्री ४७ मि. मी. पाऊस झाला. जिल्ह्यात वडसा येथे सर्वाधिक ८६ मि. मी. पावसाची नाेंद झाली. शिवाय अहेरी, भामरागड, मुलचेरा परिसरातही पावसाचा प्रभाव अधिक हाेता. नागपुरात शुक्रवारी सकाळपर्यंत ३८.७ मि. मी. पाऊस झाला. दुपारपर्यंत रिमझिम सुरू हाेती; पण त्यानंतर थाेडी उसंत घेत रात्री पुन्हा जाेर वाढविला.
वर्ध्यातही रात्री ४४ व दिवसा ११ मि. मी. पावसाची नाेंद झाली. अकाेला, अमरावती, यवतमाळात हलका पाऊस झाला. बुलढाण्यात शुक्रवारी हलक्या सरी बरसल्या, तर वाशिमला मात्र पावसाने हुलकावणी दिली.
विदर्भात आतापर्यंत सरासरी ५९५.९ मि. मी. पावसाची नाेंद झाली आहे. अद्याप १० टक्के तूट आहे पण आजच्या पावसाने तूट भरून निघण्यास मदत झाली. दि. १८ ऑगस्टपर्यंत सरासरी ६८५.२ मि. मी. पाऊस अपेक्षित असताे. अकाेला, अमरावती, बुलढाणा अद्यापही धाेकादायक स्थितीत आहेत. पूर्व विदर्भात मात्र तूट भरून निघत आहे.
दाेनच दिवस मुक्काम
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दाेन दिवस म्हणजे १९ व २० ऑगस्टला जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता आहे. दाेन दिवस ‘यलाे अलर्ट’ दिला आहे. त्यानंतर मात्र पुन्हा पाऊस उघडीप देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऑगस्टचा शेवटचा आठवडा काेरडाच जाण्याची शक्यता आहे.
गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत दिलासा...
गोंदिया/ भंडारा : दहा-बारा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यात एंट्री मारली आहे. गुरुवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही कायम होता. पावसामुळे रोवणी केलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) पावसाची सरासरी ३३.१ मि. मी. एवढी नोंदविण्यात आली.
भंडारा, पवनी व लाखांदूर तालुक्यांत अतिवृष्टी
भंडारा जिल्ह्यात २४ तासांत दमदार पावसाचे आगमन झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत भंडारा, पवनी व लाखांदूर तालुक्यांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली, तर तुमसर व मोहाडी तालुक्यांत सरासरी ६० मिलिमीटर पाऊस बरसला. सुकण्याच्या अवस्थेत आलेले धान वाचविण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्याची वेळ आली होती. उकाड्यातही वाढ झाली होती. या पावसामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
वैनगंगा फुगली, गोसेखुर्दचे ११ गेट उघडले
भंडारा जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदी फुगली आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने गोसेखुर्द प्रकल्पाचे ११ गेट शुक्रवारी सकाळपासून उघडण्यात आले आहेत. वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कारधा पुलावरून मोजण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ही पातळी मोजण्यात आली असता, २४३.३७ मीटर पाण्याची नोंद करण्यात आली. पुराचा धोका असल्याने सकाळी प्रकल्पाचे ११ गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले. सायंकाळपर्यंत हा विसर्ग सुरूच होता. त्यामधून १३६८.०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत सोडला जात आहे. दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी झाली. धापेवाडा धरणाचे तीन गेट उघडण्यात आले असून, २४०.२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुजारीटोला, बावनथडी व संजय सरोवरचे गेट अद्यापही बंद आहेत.