नागपूर : दरवर्षी अंगाची हाेरपळ करणारा नवतपा यावेळी शांतपणे सुरू झाला खरा; पण शेवटच्या टप्प्यात नेहमीच्या स्थितीत पाेहोचला आहे. जूनच्या सुरुवातीला विदर्भात पाऱ्याने चांगलीच उसळी घेतली असून, नागरिकांना नवतप्याचे चटके सहन करावे लागत आहेत. दिवसभर उष्ण लाटांनी लाेकांचे घराबाहेर पडणे मुश्कील केले आहे. हवामान विभागानेही पुढचे तीन दिवस वैदर्भीयांना उष्ण लहरींचे चटके बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
गेल्या कित्येक वर्षांत जूनच्या पहिल्या आठवड्यात उष्ण लाटांचा त्रास सहन करावा लागला नाही. मात्र, यावर्षी वातावरण बदलल्याचे दिसते. उल्लेखनीय म्हणजे मान्सूनचे वेळेपूर्वी आगमन हाेत असल्याने उन्हाळ्याचे दिवस ओसरल्याचे चित्र हाेते. माेसमी वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण तयार झाल्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे यापुढे उष्ण लहरी किंवा उन्हाचे चटके सहन करावे लागणार नाहीत, असा अंदाजही वेधशाळेने दिला. मात्र, उत्तर- पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमान वाढले आहे आणि उष्णताही वाढली आहे.
गुरुवारी अचानक तापमान वाढले. नागपुरात १.२ अंशाची वाढ हाेऊन पारा ४५ अंशावर चढला. चंद्रपूरमध्ये ४६.८ अंश तापमानाची नाेंद झाली, जी सीझनमधील सर्वाधिक तापमानाची नाेंद ठरली. विशेष म्हणजे आकाश सकाळपासून बऱ्यापैकी ढगांनी व्यापले असताना उष्णतेचे चटके बसले. ही स्थिती शुक्रवारीही कायम हाेती. आज सकाळपासूनच सूर्याचा प्रकाेप वाढला हाेता. ५ जूनपर्यंत तापमानात ३ ते ५ अंशांची सरासरी वाढ हाेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. दरम्यान, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस हाेण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.