लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दाेन दिवसांत पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी ८:३० पर्यंत येथे सर्वाधिक २४२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. गडचिराेली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून, अद्यापही अनेक गावांचा संपर्क शहरापासून तुटलेला आहे. अमरावती विभागात २४ तासांत ११ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात १०३.८ मिलीमीटर, यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात ९७.३, मालेगाव १३७.३, मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आठ गावांचा अद्यापही काही गावांचा संपर्क तुटलेला आहे.
मामुलवाडी (ता. नांदुरा जि. बुलढाणा) येथील एका वृद्धाचा मंदिराची भिंत पडल्याने मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मलकापूर तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटलेला आहे. अकोला जिल्ह्यात चिखली व खरब ढोरे या गावांना पुराचा वेढा बसला आहे.
वीज पडून दोघे ठारचिखलदरा तालुक्यातील मोरगड येथे बुधवारी दुपारी दाेन वाजता शेतात निंदण थांबवून मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतमजुरांनी झाडाखाली आश्रय घेतला, तर काही प्लास्टिकची पन्नी अंगावर घेऊन शेतात उभे राहिले. ते उभे असलेल्या झाडावर वीज कोसळल्याने एकाचा घटनास्थळी, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सात मजुरांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.