लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन. स्वामीनाथन आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या उपस्थितीत नागपूर विभागाच्या कार्मिक विभागात दोन आयटी मॉड्युलचे उद्घाटन करण्यात आले. यात कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेचा डिजिटल डिस्प्ले आणि ई-पास मॉड्युलचा समावेश आहे. ई-पास मॉड्युलला नागपूर विभागाने विकसित केले आहे. हे वेब अप्लिकेशन सर्व कर्मचाऱ्यांसाठी सोयीचे आहे. यात ओटीपी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे. यामुळे कर्मचारी सुरक्षित आणि विश्वसनीय माध्यमाद्वारे केवळ स्वत:ची सेवापुस्तिका पाहू शकणार आहेत. भविष्यात गरजेनुसार आपल्याजवळ सेवा पुस्तिका डाऊनलोड करून ठेवू शकणार आहेत. सेवापुस्तिकेची प्रत काढून जवळ ठेवू शकतील. यामुळे माहिती अधिकाराचे अर्ज कमी होतील. ई-पास मॉड्युलमुळे पास, पीटीओ, वार्षिक पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. या सुविधेमुळे पास कार्यालयातील अनावश्यक गर्दी कमी होणार आहे. नवे कर्मचारी/निवृत्त कर्मचारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात न येताच आपले ऑनलाईन खाते तयार करू शकतील. हे खाते मुख्य कार्यालय, पास अधीक्षकांतर्फे मंजुरी दिलेले राहणार आहे.