नागपूर : कागदी पुस्तकांचा खप कमी झाला असला तरी इंटरनेटमुळे वाचन खूप वाढले आहे. केवळ मुले काय वाचतात, याकडे पालकांची नजर असावी, असे प्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी म्हटले, तर साहित्य हे अत्तराच्या सुगंधासारखे मनात जपून ठेवा आणि विचारांच्या सेतूने मनुष्याचे बंध जपा, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका डॉ. निशिगंधा वाड यांनी म्हटले. एकूणच, दोघींनीही वाचनासोबतच माणसं वाचायला शिका, तरच वाचनाची गोडी वाढेल आणि वाचनसंस्कृती समृद्ध होईल, असे आवाहन केले.
सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित चौथ्या ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी मृणाल कुलकर्णी व डॉ. निशिगंधा वाड आपल्या भावना व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक व लेखक डॉ. आकाश खुराणा यांच्या ‘मेन्टॉर मार्फोसिस’ या पुस्तकाचे तर रायसोनी ग्रुपचे सुनील रायसोनी यांच्या ‘विस्टम स्ट्रोक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर शोभा रायसोनी, वर्षा मनोहर व डॉ. राजन वेळूकर उपस्थित होते. यावेळी ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टच्या नव्या लोगोचे लोकार्पण करण्यात आले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. हा साहित्य महोत्सव २० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
आयुष्यातील ‘फ्रेण्टॉर्स’ जपा - आकाश खुराणा
- ७० वर्षांपूर्वी माझे आई-वडील नागपुरात आले आणि त्यानंतर माझी जडणघडण नागपुरातच झाली. तेव्हाच्या माझ्या काही मित्रांची आठवण आजही ताजी आहे आणि ते खऱ्या अर्थाने माझे मेण्टॉर होते. एका अर्थाने प्रत्येकाने आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अशा ‘फ्रेण्टॉर्स’ची जपवणूक करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. आकाश खुराणा यावेळी म्हणाले.