आनंद डेकाटे
नागपूर : अनेक वर्षानंतर भारताला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आत्मनिर्भर पंतप्रधान लाभले आहेत. ते २०-२० तास काम करतात. देश आता अधिक गतीने प्रगती करीत आहे. जगात भारतातील लोक आता गौरव करू लागले आहेत. पूर्वी जगातील नेते आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीवर हात ठेवायचे परंतु आता चित्र बदलले आहे, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील नेत्यांच्या पाठीवर हात ठेवतात, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यंदा ९९ वर्षे पूर्ण करून शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे या शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होमो भाभा राष्ट्रीय संस्थांचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर होते.
मराठी भाषेतल्या भाषणाची स्तुती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबई येथील महाराष्ट्र संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर आज नागपूरमध्ये त्यांचा सुरू बदललेला दिसला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त बोलताना त्यांनी ज्येष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर यांनी केलेल्या मराठी भाषेतल्या भाषणाची स्तुती केली. ज्या राज्याची जी भाषा आहे, त्या भाषेत बोलणे हे उत्तम असल्याचे सांगत आपल्यालाही मराठीवर प्रेम असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केली.