नागपूर : पाच वर्षांपूर्वी नागपुरात राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापण्याची संकल्पना पुढे आल्यानंतर त्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. कधी याेग्य जमीन मिळत नव्हती तर कधी इतर विद्यापीठांच्या जागेमुळे त्यात खाेळंबा आला. अनेकदा निधीअभावी काम रखडले. मात्र सर्व अडथळ्यांना पार करून विधी विद्यापीठ साकारले जात असल्याने नागपूरकर म्हणून अभिमान वाटत असल्याची भावना सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय विधी विद्यापीठांतर्गत मुलामुलींच्या वसतिगृहाच्या लाेकार्पणप्रसंगी ते बाेलत हाेते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वाेच्च न्यायालयाचे न्या. पी.एस. नरसिम्हा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्या. सुनील शुक्रे, विधी विद्यापीठाच्या निर्मिती समितीचे चेअरमन न्या. अनिल किलाेर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजेंदर कुमार, रजिस्ट्रार डाॅ. आशिष दीक्षित, ओएसडी डाॅ. चामार्ती रमेश कुमार प्रामुख्याने उपस्थित हाेते.
न्या. नरसिम्हा यांनी विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना न्यायदानाची पंचसूत्री सांगितली. चांगले वकील किंवा न्यायमूर्ती हाेताना गरीब-श्रीमंत, गरजू-अगरजू, राजकीय प्रभाव न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकाेनाने सत्याची बाजू धरून ठेवावी, लक्ष आणि एकाग्रता ठेवावी, दिलेले कार्य पूर्णत्वास जाईपर्यंत थांबायचे नाही आणि कठीण परिश्रम अशी ही पंचसूत्री आहे. तुम्ही देशाला काही द्या, देश तुम्हाला भरभरून देईल, असा संदेश त्यांनी दिला. न्या. शुक्रे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेतला. डाॅ. आशिष दीक्षित यांनी आभार मानले.
न्याय द्यायला, निर्णय घ्यायला उशीर झाला तर नुकसानच हाेते : गडकरी
आजच्या काळात वेळ ही सर्वात माेठे भांडवल आहे. ज्याप्रमाणे न्यायदानाला उशीर झाला तर न्यायाला अर्थ राहत नाही, तसेच प्रशासकीय कामात एखाद्या अधिकाऱ्याने वेळेवर निर्णय घेतला नाही तर देशाला काेट्यवधीचे नुकसान हाेऊ शकते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. संस्थेची उभारणी करताना सरकारच्या पैशांच्या भरवशावर राहू नका. शैक्षणिक संस्था नफा देणाऱ्या असतात, त्याचे नियाेजन करा, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर आता ‘एज्युकेशन हब’ बनत आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या येत आहेत. बुटीबोरी ते कन्हान हा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. या मार्गावर विधी विद्यापीठासाठी विशेष थांबा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. आपली लोकशाही ही चार स्तंभांवर उभी आहे. त्यामधील न्यायव्यवस्था अतिशय बळकट, दर्जेदार असणे लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाला जागतिक दर्जाची ओळख बहाल करा, असे आवाहन त्यांनी केले.
न्याय असलेले राष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करते : फडणवीस
ज्या समाजात न्यायाचे राज्य आहे ते राज्य, राष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करते. भारताला तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनायचे आहे. त्यामुळे अन्य राष्ट्रांना आकर्षित करण्यासाठी देशात कायद्याचे प्रभावी राज्य निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सामान्य माणसाची शेवटची आशाही न्यायालय असते. भारताची न्यायिक व्यवस्था विश्वासार्ह आहे, असा संदेश जागतिक स्तरावर गेला पाहिजे. त्यासाठी भारताचा गौरव वाढविणारे विद्यापीठ निर्माण करा. न्याय विधी क्षेत्रात वैश्विक मान्यता असणारे मनुष्यबळ नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातून तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्यासाठी साहाय्यक ठरावे, असे आवाहनही त्यांनी केले. पक्षीय मतभेद सोडून विधी विद्यापीठासाठी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. येणाऱ्या पिढीसाठीचे हे काम असून दर्जेदार मनुष्यबळ निर्मितीची बीज पेरणी या माध्यमातून करायची आहे. दर्जेदार मनुष्यबळ व शैक्षणिक सुविधा, आर्थिक विकासाचा मूलमंत्र आहे, असे ते म्हणाले.
न्या.गवईंची राजकीय फटकेबाजी
न्या.भूषण गवई यांची राजकीय फटकेबाजी चर्चेचा विषय ठरली. गेल्या वर्षी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाला तांत्रिक अडचणींमुळे देवेंद्र फडणवीस यांना बाेलविता आले नाही, त्यामुळे ते नाराज झाले हाेते. यापुढे असे हाेणार नाही, अशी ग्वाही देत विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचे याेगदान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून नुकतंच महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींकडे माझे लक्ष होते. मी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण करताना शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांना सांगताना पाहिले. एकनाथ शिंदे आणि नागपूरचे माजी पालकमंत्री नितीन राऊत यांच्यात दाढीची साम्यता आहेत. आताही नागपूरचे पालकमंत्री कोण होतात, हे माहीत नाही. फडणवीस यांच्या मनात कोण आहे, माहीत नाही. चंद्रशेखर बावनकुळे व नितीन राऊत यांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे कोणीतरी ऊर्जावान मंत्री पालकमंत्री होईल, अशी अशा असल्याचे न्या.गवई म्हणाले.