सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या उपचारांचा कालावधी पूर्ण करून घरी गेलेल्या काही रुग्णांमध्ये फुप्फुसाचा आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘पल्मनरी मेडिसीनच्या पोस्ट कोविड’ विभागात मागील पाच महिन्यांत १३२८ रुग्ण उपचारांसाठी आले. यातील १० टक्के म्हणजे, १३४ रुग्णांना ‘पल्मनरी (लंग) फायब्रोसीस’चे निदान झाले. धक्कादायक म्हणजे, यातील १३.७२ टक्के, २८ रुग्ण हे ‘हेल्थ केअर वर्कर’ आहेत.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती. परंतु, जून महिन्यापासून रुग्ण व मृत्यूच्या संख्येत मोठी घट आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. मात्र, आता कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये विविध आजारांची लक्षणे दिसून येऊ लागल्याने चिंता वाढली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा ‘पल्मनरी मेडिसीन’ विभागातील ‘पोस्ट कोविड ओपीडी’ फेब्रुवारी महिन्यात १३४, मार्च महिन्यात ११५, एप्रिल महिन्यात २०४, मे महिन्यात सर्वाधिक ७३३, जून महिन्यात १०४, तर ६ जुलैपर्यंत ३८ असे एकूण १३२८ रुग्णांची नोंद झाली. फुप्फुसामध्ये सर्वात घातक आजार असलेला ‘पल्मनरी फायब्रोसीस’चे १३४ रुग्ण दिसून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, यात ४० वर्षांवरील रुग्णांची संख्या अधिक आहे.
-पहिल्या लाटेत ‘फायब्रोसिस’चे १६ टक्के रुग्ण
कोरोनाचा पहिल्या लाटेतील सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत ‘पोस्ट कोविड ओपीडी’मध्ये ४३९ रुग्ण उपचारांसाठी आले. यात २४३ पुरुष, तर १९६ महिलांचा समावेश होता. यातील १६.६२ टक्के म्हणजे, ७३ रुग्णांना ‘पल्मनरी फायब्रोसिस’ होते.
- ‘फायब्रोसिस’ धोकादायक!
मेडिकलच्या पल्मनरी विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, फुप्फुसाच्या त्रासाला वैद्यकीय भाषेत ‘लंग इन्फेक्शन फायब्रोसिस’ म्हणतात. यात कोरोनाची लागण झाल्यावर फुप्फुसात संसर्ग होतो. उपचारांनंतर या संसर्गाचे व्रण राहतात. यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. रुग्णाला धाप लागते. तीव्र स्वरुपाच्या लंग फायब्रोसिसचा प्रभाव हृदयावर पडतो. हृदय कमजोर होऊ शकते. रुग्णाची स्थिती चिंताजनक झाल्यास फुप्फुस तर काही प्रकरणांमध्ये फुप्फुस व हृदय दोन्ही अवयव प्रत्यारोपण करण्याची गरज पडते.
- कोरोनानंतर फुप्फुसांची तपासणी आवश्यक ()
‘पल्मनरी फायब्रोसिस’चे अनेक टप्पे आणि प्रकार आहेत. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे जीवनाची गुणवत्ता आणि कालावधीवर थेट परिणाम होतो. यामुळे कोरोनाचे प्रतिबंधक नियम पाळून आजारालाच दूर ठेवणेच हाच एक पर्याय आहे. कोरोनानंतर फुप्फुसांची तपासणी करून घेणे, लक्षणांवर लक्ष ठेवणे व उपचार करणे अतिशय आवश्यक आहे.
-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, पल्मनरी मेडिसीन, मेडिकल
..................................................................
पोस्ट कोविडचे रुग्ण : १३२८
पुरुष : ८००
महिला : ५२८
हेल्थ केअर वर्कर : २०४
पल्मनरी फायब्रोसिसचे रुग्ण : १३४
फायब्रोसिस असलेल्या हेल्थ वर्करची संख्या : २८
..........................................................................