नागपूर : गुरुवारी सायंकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळताना विहिरीत पडल्याने एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. सिद्धेश संदीप शाहू (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. गांधी पुतळ्याजवळ गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. ती उघडकीस आल्यानंतर परिसरात तीव्र शोककळा पसरली. नंदनवनमधील तेजस्विनी स्कूलचा केजी-१ चा विद्यार्थी असलेला सिद्धेश जुनी शुक्रवारी परिसरातील शाहू समाज भवनाजवळ राहत होता. बाजूलाच गांधी पुतळ्याजवळच्या उद्यान परिसरात सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. तेथे एक विहीर खोदण्यात आली असून, ती अर्धवट स्थितीत आहे. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर कामगार तेथून सायंकाळी निघून गेले. मात्र, त्यांनी जमिनीला समांतर विहिरीवर जाळी टाकली नाही. दरम्यान, याच भागात चिमुकला सिद्धेश, त्याचा मित्र अथर्व आणि अन्य काही सवंगड्यांसह क्रिकेट खेळत होते. मित्राने फटकावलेला बॉल पकडण्याच्या प्रयत्नात धावत निघालेला सिद्धेश विहिरीत पडला. ते पाहून घाबरलेले मित्र घरी गेले अन् बराच वेळ गप्प बसले. दरम्यान, अंधार पडला तरी सिद्धेश घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे मोठे वडील राकेश शाहू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्याचा शोध घेणे सुरू केले. तो उद्यानात क्रिकेट खेळत होता, अशी माहिती मिळाल्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावले असता सिद्धेश पडून दिसला. राकेश यांनी लगेच विहिरीत उतरून सिद्धेशला बाहेर काढले. त्याला प्रारंभी खासगी आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी) वडिलांना धक्का, आई बेशुद्ध सिद्धेशचे वडील रेशन दुकान चालवितात आणि खासगी बँकेच्या खातेधारकांची रक्कम गोळा करतात तर आई शीतल गृहिणी आहे. सिद्धेश त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच वडिलांना जबर मानसिक धक्का बसला. आई शीतलची शुद्धच हरपली. या घटनेने परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. कोतवाली किंवा तहसील ठाण्यात या प्रकरणाची रात्रीपर्यंत माहिती नव्हती. मनपा व कंत्राटदाराचा निष्काळजीपणा भोवला गांधी पुतळ्याजवळच्या उद्यान परिसरात सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. येथे कारंजे उभारले जाणार आहेत. त्यासाठी एक विहीर खोदण्यात आली आहे. वास्तविकता सायंकाळी काम संपल्यावर त्या विहिरीवर काहीतरी झाकणे आवश्यक होते. मात्र, तसे न केल्यामुळे चिमुकल्या सिद्धेशचा जीव गेला. या प्रकरणी महापालिकेच्या झोनमधील कामाची जबाबदारी असलेले अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शाहू कुटुंबीयांनी केली आहे.
क्रिकेट खेळताना चिमुकला पडला विहिरीत करुण अंत : गांधी पुतळ्याजवळील दुर्घटना
By admin | Published: December 30, 2016 2:21 AM