लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या वॉर्ड क्र. २३ मध्ये सिकलसेलच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली असताना कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी तब्बल नऊ तास मृतदेह उचललाच नाही. या प्रकरणाने मेडिकलमध्ये खळबळ उडाली. अखेर वैद्यकीय अधीक्षकांसह इतरही वरिष्ठ डॉक्टरांनी समजूत काढल्याने प्रकरण निवळले. या प्रकरणाची अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.सुनील सुशांत सराटे (२३) रा. कुही फाटा, उमरेड रोड असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सुनील हा सिकलसेलचा रुग्ण होता. त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मेडिकलमध्ये आणले. डॉक्टरांनी तपासून औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक २३ मध्ये भरती केले. उपचाराला सुरुवात झाली. परंतु पहाटे त्याची प्रकृती गंभीर झाली. याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला दिली. परंतु परिचारिकेने याकडे दुर्लक्ष केले, असा नातेवाईकांचा आरोप आहे. याचदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे तणाव वाढला. सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत मृतदेह वॉर्डात होता. यादरम्यान नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्याकडे तक्रारही केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व इतरही वरिष्ठ डॉक्टरांनी नातेवाईकांची समजूत काढली. अखेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाची डॉ. मित्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सोमवारी नेमके प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.
मेडिकलमधील घटना : नऊ तास मृतदेह उचललाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:37 PM
मेडिकलच्या वॉर्ड क्र. २३ मध्ये सिकलसेलच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली असताना कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी तब्बल नऊ तास मृतदेह उचललाच नाही.
ठळक मुद्दे परिचारिकेवर हलगर्जीपणाचा आरोप