योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात तरुण विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासंदर्भात विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. अध्यासनात येऊन नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांचे विचार ग्रहण करावेत यासाठी त्यांच्या सोईचा ‘पदविका’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यासंदर्भात कुलगुरूंनी विभागप्रमुखांकडून प्रस्तावदेखील मागविला असून पदव्युत्तर पदवी नव्हे तर या पदविकेसाठीच ‘स्टायपेंड’ देण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अध्यासन सुरू झाल्यानंतर येथे सुरुवातीला विद्यार्थीच मिळत नव्हते. अखेर या अध्यासनाबाबत प्रचार-प्रसार केल्यानंतर विद्यार्थी मिळण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षांपासून तर चांगल्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. मात्र यात तरुण विद्यार्थ्यांची संख्या हवी तेवढी नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित ज्येष्ठ किंवा वयाने मोठे असलेल्या नागरिकांनी येथे प्रवेश घेतले आहेत. त्यामुळेच येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यावेत यासाठी विशेष शिष्यवृत्ती ‘पॅटर्न’ राबविण्याचे कुलगुरुंनी सांगितले होते.यासंदर्भात मागील महिन्यात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंथन झाले. या विभागात सुरू असलेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हा रोजगाराभिमुख नाही. त्यामुळे याकडे तरुणांची पावले वळत नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला व समाजाला आवश्यकता आहे. याकडे तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात यावे व त्यांचे विचार आत्मसात करावे, या उद्देशातून येथे तरुणांच्या सोईचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात यावी, अशी सूचना व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत देण्यात आली होती.यासंदर्भात विभागप्रमुख डॉ.प्रदीप विटाळकर यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून कुलगुरूंनी यासंदर्भात त्यांच्याकडून प्रस्ताव मागविला आहे. प्रभारी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. तरुण पिढीत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचणे आवश्यक आहेत. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमांसोबतच पदविका अभ्यासक्रमाचादेखील अध्यासनात समावेश करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्यासनातील विद्यावेतन ‘पॅटर्न’ ठरलेले नाही३५ वर्षांखालील विद्यार्थ्यांना विद्यावेतन किंवा शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केला होता. परंतु आता पदवी अभ्यासक्रमाऐवजी नवीन पदविका अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यावर त्यालाच ही योजना लागू करण्याचा त्यांचा विचार आहे. याबाबत विभागप्रमुख डॉ.प्रदीप विटाळकर यांना विचारणा केली असता, कुलगुरूंचा असा मानस असल्याचे त्यांनीदेखील मान्य केले. परंतु अद्याप नेमकी प्रणाली काय असेल हे निश्चित झाले नसून मी अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.