नागपूर : आयकर चुकवेगिरी करणारे वर्धमाननगर येथील कोळसा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने बुधवारी सकाळी ६ वाजता १० ठिकाणी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख रक्कम आणि लॉकर्स ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नागपुरातील काही कोळसा व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर असून त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या कारवाईने कोळसा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अनंत अग्रवाल असे व्यापाऱ्याचे नाव आहे. संगिता सेल्स प्रा.लि. या फर्मद्वारे ते कोळशाचा व्यवसाय करतात. वर्धमाननगर, ह्यडे टू डेह्णसमोर ह्यराम वाटिकाह्ण नावाने त्यांचे निवासस्थान आणि कार्यालय आहे. लगतच्या परिसरातही कार्यालये आहेत. अनंत अग्रवाल यांचे भाऊ अरूण अग्रवाल आणि नागपूर व चंद्रपूर येथे कार्यरत कोळसा व्यापारी चढ्ढा यांचे निवासस्थान आणि कार्यालयावरही अधिकाऱ्यांनी छापे टाकले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि व्यवहाराच्या नोंदी असलेली कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूरचे ५० हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिन्ही व्यावसायिकांवर छापे टाकले. लॉकर्सची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. व्यापाऱ्यांचे आणखी काही लॉकर्स असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. या लॉकर्समध्ये व्यापाऱ्यांनी व्यवहाराची काही कागदपत्रे लपवून ठेवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई गुरुवारपर्यंत सुरू राहील.