Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आयकर विभागानं छापेमारी केली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारात आयकर विभागाचं पथक अनिल देशमुखांच्या घरी दाखल झालं आहे. देशमुखांच्या नागपूर निवासस्थानासोबतच मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागानं छापेमारी केली आहे.
ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही; नेमके कारण काय?
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. यापूर्वी देशमुख यांच्या घरीवर ईडीकडून दोनवेळा आणि सीबीआयनंही धाडी टाकल्या आहेत. ईडी, सीबीआय नंतर आता आयकर विभागानंही अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे.
मनी लॉड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलेला असताना आता आयकर विभागाच्या छाप्यांनी त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.
अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नाव नसल्याची माहिती समोर येत असून, अनिल देशमुखांची अद्याप चौकशीच झालेली नसल्याचे कारण ईडीकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासह अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे.