लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर/चंद्रपूर : पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. धाडीत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख तसेच पासपोर्ट आणि विविध बँकांमधील लॉकर्सची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीमुळे कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.नितीन उपरे, संजय अग्रवाल, रणजित छाबडा व मित्तल हे चंद्रपूर येथील स्वामी फ्युएल कंपनीचे संचालक तर संजय अग्रवाल हे सूर्या ट्रान्सपोर्टचे संचालक आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय चंद्रपूर येथे असून सर्व संचालकांचे निवासस्थान नागपुरात आहेत. कंपनीचे चंद्रपूर, वणी, घुग्घुस व उमरेड येथेही कार्यालय आहेत. अधिकाऱ्यांनी नितीन उपरे यांच्या नागपुरातील रामदासपेठ तर संजय अग्रवाल यांच्या छाप्रूनगर, वर्धमाननगर, सूर्यनगर आणि कोराडी येथील कार्यालय व निवासस्थानावर धाडी टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील कर्नाटक-एम्टा कोळसा खाण कर्नाटक पॉवर प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली होती. पुढे प्रकल्प बंद झाला. त्यामुळे सन २०१२ मध्ये खाणीतून कोळशाचे उत्खननही बंद झाले. पण वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने या खाणीतून गेल्या पाच वर्षांपासून कोळशाचे अवैध उत्खनन सुरू आहे. महिन्याला एक लाख टन कोळशाचे उत्खनन करण्यात येते. ८०० रुपये टन किमतीच्या कोळशाची कंपन्यांना ६ हजार रुपये टन भावाने विक्री करण्यात येत होती. २०० रुपये वाहतूक खर्च वगळता व्यावसायिक एका टनामागे ५ हजार रुपये नफा कमवित होते. या व्यवहारात चारही व्यावसायिकांनी करचुकवेगिरी करीत काही वर्षांतच कोट्यवधींचे उत्पन्न मिळविले आहे. याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागाच्या जवळपास १०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एकत्रितरीत्या धाडी टाकल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर धाडी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. कारवाई आणखी दोन दिवस सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.
नागपूर व चंद्रपूर येथील कोळसा व्यावसायिकांवर आयकर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 9:24 PM
पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. धाडीत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख तसेच पासपोर्ट आणि विविध बँकांमधील लॉकर्सची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीमुळे कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे करचुकवेगिरी : कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त, कारवाई उद्याही सुरू राहणार