कागदपत्रे जप्त, लॉकर्स सील : वैद्यकीय क्षेत्र हादरले नागपूर : आयकर अधिकाऱ्यांच्या चमूने पुन्हा शनिवारी एकाच वेळी दोन नामांकित हॉस्पिटलवर धाडी टाकल्या. या रुग्णालयांमध्ये धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटल आणि काँग्रेसनगर येथील श्रीकृष्ण हृदयालय व क्रिटिकल केअर सेंटरचा समावेश आहे. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. आयकर अधिकाऱ्यांनी गोपनीय पद्धतीने कारवाई केली. विभागातर्फे अशीच कारवाई आणखी तीन महिने सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, कारवाईनंतरही रुग्णांवर उपचार सुरू होते. डॉ. चंद्रशेखर पाखमोडे आणि डॉ. प्रमोद गिरी हे न्यूरॉन हॉस्पिटलचे संचालक तर डॉ. महेश फुलवानी हे श्रीकृष्ण हृदयालयाचे संचालक आहेत. दोन्ही हॉस्पिटल आणि अन्य संबंधित परिसरात धाडीच्या कारवाईसाठी आयकर विभागाने आठ चमू तयार केल्या होत्या. प्रत्येक चमूत १२ अधिकारी आणि कर्मचारी होते. प्रत्येक चमू धाड टाकण्यासाठी दोन-दोन गाड्यांसह हॉस्पिटलसह संबंधित आठ ठिकाणी सकाळी ८ वाजता पोहोचली. अधिकाऱ्यांनी तातडीने महत्त्वपूर्ण कागदपत्रांची तपासणी सुरू केली. रोखीच्या व्यवहाराची कागदपत्रे मागण्यात आली. कारवाईदरम्यान काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि विविध बँकांमधील लॉकर्स सील केल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉ. फुलवानी यांच्या एका नातेवाईकाच्या हॉस्पिटलवरसुद्धा कारवाई केल्याची माहिती आहे. कारवाईदरम्यान रोखीच्या जप्तीवर अधिकाऱ्यांनी सांगण्यात नकार दिला. दोन्ही हॉस्पिटलवर आणखी तीन दिवस कारवाई सुरू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. डॉ. प्रमोद गिरी हे शासकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या न्यूरो सर्जरी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनीच न्यूरॉन हॉस्पिटल सुरू केले आहे. शहरातील अन्य हॉस्पिटलवर आयकर विभागाने धाडी टाकल्याची अफवा दिवसभर होती. पण ही अफवाच असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नामांकित हॉस्पिटलवर आयकर धाडी
By admin | Published: February 12, 2017 2:18 AM