लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही, मात्र येणारे सरकार तकलादू नसेल असे आश्वस्त प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले. विदर्भातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते दोन दिवसांपासून नागपुरात वास्तव्याला आहेत.या पत्रपरिषदेत ते पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. सरकार चालवताना हा मुद्दा आम्ही कायमच डोळ््यासमोर ठेवू. मुस्लीम आरक्षणासंदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये चर्चा करू. हे सरकार केव्हा स्थापन होईल हे आत्ता सांगू शकत नाही. मात्र मध्यावधी निवडणुका होणार नाही. पाच वर्ष स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि येणारे सरकार तकलादू नसेल. महिला मुख्यमंत्र्यांच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सध्या त्याविषयी काही विचार नाही, असे म्हटले. शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कुणाशीही चर्चा सुरू नसल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.