लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमध्ये सध्या बऱ्यापैकी शिथिलता आली आहे. लोकांची कामे सुरु झाली आहेत. परंतु कोरोनाची भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही. बहुतांश लोकांनी त्यांच्या घरातील घरकामगार किंवा मोलकरणींची सेवा अजूनही नियमित केलेली नाही, परिणामी घरकामगार व मोलकरणींची परवड सुरूच आहे. अशा परिस्थितीत यांनी जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.कोरोनाच्या संकटामुळे मागील अडीच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद होता. हातावर पोट असणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. अजूनही लॉकडाऊन सुरुच आहे. परंतु यात शिथिलता देण्यात आलेली आहे. शहरातील व्यवहार बऱ्यापैकी सुरू झाले आहेत. काही अपवाद वगळता दुकाने, खासगी प्रतिष्ठाने, व्यापारी केंद्र, कार्यालये, बांधकामे सुरु झाली आहेत. कामे सुरू झाल्याने लोकांना थोडा दिलासा मिळाला. परंतु घरकामगार व मोलकरणींची समस्या मात्र कायम आहे. हाऊसिंग सोसायटी आणि विशेषत: उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वस्त्यांमधील लोकांनी त्यांच्या घरातील मोलकरणीचे काम लॉकडाऊन लागल्यापासून बंद केले आहे. काही अपवाद सोडले तर अजूनही मोलकरणींची सेवा नियमित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे जगण्याची समस्या निर्माण झाली आहे.नियोक्त्यांनी किमान दोन महिन्याचे वेतन द्यावेमोलकरणी या अतिशय गरीब कुटुंबातून येतात. त्यांच्या घरातील मंडळीही असंघटित क्षेत्रातच काम करणारी असतात. लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक फटका याच वर्गाला बसला आहे. कोरोनाची भीती आपण समजू शकतो. परंतु मोलकरीण ठेवणाऱ्या नियोक्त्यांनी सुद्धा एक गोष्ट समजून घ्यायला हवी. मोलकरीण आणि घरमालक यांचे एक नाते निर्माण झाले असते. विश्वासाने ती त्यांच्याकडे काम करते. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांचे काम सध्या बंद ठेवण्याची मजबुरी असेल तर ठीक आहे. परंतु त्यांचीही मजबुरी समजून घ्या. त्यांना किमान दोन महिन्याचे आगाऊ वेतन मालकांनी द्यावे. नंतर त्यांच्या पगारातून थोडे-थोडे कापावे, अशी आमची मागणी आहे. परंतु हे होताना दिसून येत नाही. ही खंत आहे.विलास भोंगाडेसचिव, विदर्भ मोलकरीण संघटना
घरकामगार-मोलकरणींची परवड सुरूच : अनेकांची कामे बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 8:27 PM