लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र एक्सप्रेस ऐन वेळी रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना आल्यापावली परत जावे लागले. सर्वांच्या मोबाईलवर रेल्वेने मेसेज पाठविले. परंतु अनेकजण दुसऱ्याला तिकीट काढण्यास सांगतात. संबंधित व्यक्ती आपला मोबाईल क्रमांक टाकतो. त्यामुळे हे मेसेज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलवर गेलेच नाही आणि माहिती नसल्यामुळे ते रेल्वेस्थानकावर पोहोचले.
शुक्रवारी रात्री मिरजजवळील पूल नादुरुस्त झाला. त्यामुळे गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ऐन वेळी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. या गाडीने गोंदियावरून २२६, तिरोडावरून ११, तुमसरवरून १३, भंडाऱ्यावरून १९, कामठीवरून १० आणि इतवारीवरून ८ प्रवासी या गाडीत बसणार होते. नागपूरवरून सेकंड एसीत ७, थर्ड एसीमध्ये २७, स्लीपरमध्ये २२७, धामणगाववरून स्लीपरमध्ये १५, पुलगावमध्ये स्लीपरमध्ये २० प्रवासी बसणार होते. परंतु ऐन वेळी ही गाडीच रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक प्रवासी माहिती न मिळाल्यामुळे रेल्वेस्थानकावर पोहोचले. रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द झाल्याबाबत सुचना फलक लावला होता. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या बाहेरुनच घरी परत जावे लागल्याची माहिती रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्यांनी दिली. यात प्रवाशांना रेल्वेस्थानकावर येण्यासाठी आणि परत घरी जाण्यासाठी विनाकारण ऑटोचे पैसे खर्च करावे लागले.