‘चिफ रुलिंग स्टाफ इंजिनिअर’चा दौरा : अधिकाऱ्यांना फटकारलेनागपूर : रेल्वेस्थानकावर प्रवाशांना अनेक अडचणी येतात. प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांची योग्य ती देखभाल न केल्यामुळे घाण साचून दुर्गंधी पसरते. अनेकदा टपकणाऱ्या छतामुळे प्लॅटफार्मवर उभे राहणेही कठीण होऊन बसते. रविवारी मुंबईचे चिफ रुलिंग स्टाफ इंजिनिअर (सीआरएसई) एन. के. नंदनवार यांनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. रेल्वेस्थानकावर आढळलेल्या समस्यावर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारून या असुविधांबाबत जाब विचारला.रविवारी मध्य रेल्वेचे ‘सीआरएसई’ एन. के. नंदनवार यांनी नागपूर रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. दौऱ्यादरम्यान वरिष्ठ विभागीय यांत्रीक अभियंता परिवेश शाहू, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव, मुख्य आरोग्य अधीक्षक विनोद आसुदानी, स्टेशन व्यवस्थापक दिनेश नागदेवे, कार्य निरीक्षक गोपाल पाठक, प्रवाशी सुविधा पर्यवेक्षक प्रविण रोकडे उपस्थित होते. दौऱ्यात त्यांनी सर्वप्रथम रेल्वेस्थानकावरील सेकंड क्लास वेटिंग हॉल, प्लॅटफार्म क्रमांक एकवरील स्वच्छतागृहांची पाहणी केली. तेथे त्यांना दुर्गंधीचे वातावरण आढळल्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. प्लॅटफार्मवर ठेवण्यात आलेल्या डस्टबीनमध्ये बऱ्याच प्रमाणात कचरा साचल्यामुळे त्या घाणीच्या वातावरणात प्रवाशांना उभे राहणेही कठीण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. रिझर्व्हेशन कार्यालयाच्या छतातून पाणी टपकून ते खाली पडत होते. प्लॅटफार्म क्रमांक ६ वर छत टपकत असल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यास जागा नसल्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. एमसीओ गेटच्या आतील भिंतीवर जाळ््या लागल्यामुळे तेथील स्वच्छता का करण्यात आली नाही, याची विचारणा त्यांनी केली. प्लॅटफार्म क्रमांक ६ आणि ७ वरील वॉटर लिकेज पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रवाशांच्या सुविधाबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी पाहणी दौऱ्यानंतर स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना चांगलेच सुनावल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानंतर रेल्वेस्थानकावर प्रवाशांना कशा सुविधा पुरवाव्या याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या पाहणी दौऱ्यानंतर तरी रेल्वेस्थानकावरील असुविधा दूर होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकावर असुविधा का ?
By admin | Published: September 19, 2016 2:46 AM