हनुमंत ताटे : महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अधिवेशननागपूर : एस. टी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे ५२ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन २८ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता उमरेड मार्गावरील बहादुरा टोल नाक्याजवळ आयोजित करण्यात आले असून यात ५० हजार कामगार सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनात कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.हनुमंत ताटे म्हणाले, एस. टी. कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करुन त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची तसेच एस. टी. कामगारांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्याची गरज आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि एस. टी. कामगारांचे वेतन यात खूप तफावत असून ती दूर करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी एसटीच्या प्रतिकूल आर्थिक स्थितीचे कारण पुढे करून शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात टाळाटाळ करण्यात येते. एसटीच्या प्रतिकूल आर्थिक स्थितीस कर्मचारी जबाबदार नसल्याचे शासनाने नेमलेल्या विविध समित्यांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आर्थिक कारण पुढे न करता आर्थिक बोजा स्वीकारून केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासन कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करते. याशिवाय नोकर भरतीत कामगारांच्या मुलांना पाच टक्के आरक्षण, वैद्यकीय अपात्र कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरी, वैद्यकीय कॅशलेस योजना, मोफत पास सर्व गाड्यांना लागू करावा आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीस वर्षभर मोफत पास देण्याची मागणी त्यांनी केली. शासनाने कामगारांच्या मागण्यांबाबत टाळाटाळ केल्यास बेमुदत संप करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात येणार असल्याचे ताटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सुभाष वंजारी, गजानन धुमाळ, राजेंद्र बंगाले, सय्यद समद उपस्थित होते. (प्रतिनिधी)
-तर संप अटळ
By admin | Published: February 27, 2016 3:28 AM