केबल आॅपरेटरकडील करचोरी : ५० हजाराचा दंडनागपूर : केबल आॅपरेटरकडून होणाऱ्या करचोरीवर आळा घालण्यासाठी शासनाने दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. करचोरी केल्यास ५० हजाराचा दंड किंवा महसूल हानीच्या दहापट दंड यापैकी जी रक्कम जास्त असेल ती आॅपरेटरवर आकारण्यात येणार आहे. पूर्वी ही रक्कम एक हजार रुपये होती. केबल परिचालकांडून केबल जोडणीधारकांच्या संख्येची चुकीची माहिती देण्यात येत असल्याने शासनाला कराच्या रूपात मिळणारा महसूल बुडत होता. एक वर्षापासून‘सेटटॉप बॉक्स’ बंधनकारक केल्यामुळे जोडणीधारकांची खरी संख्या समोर आली. शासनाकडून प्रत्येक जोडणीधारकावर शहरात ४५ रुपये तर ग्रामीण भागासाठी १५ रुपये कर के बल आॅपरेटरला शासनाकडे जमा करायचा असतो.कर कोणी वसूल करावा, यावर स्थानिक केबल आॅपरेटर व मुख्य केबल आॅपरेटर (एमएसओ) यांच्यात वाद आहे. त्यामुळे कर वसुलीवर परिणाम झाला आहे. करचोरी रोखण्यासाठी शासनानो दंडाच्या रकमेत ५० पटाची वाढ केली आहे. पूर्वी ही रक्कम ५०० ते १ हजार रुपये होती. आता ५० हजार किंवा महसूल हानीच्या दहापट दंड यापैकी जे जास्त असेल ते आकारण्यात येणार आहे. करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे हे यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी नागपूर जिल्ह्यासाठी २० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागपूर शहरात चार मुख्य केबल आॅपरेटर असून, केबल जोडणीधारकांची एकूण संख्या ४ लाख ९९ हजार आहे. मात्र संख्येच्या तुलनेत कर जमा होत नाही. ही थकबाकी सध्या २५ कोटींवर गेली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच मुख्य केबल आॅपरेटर्सची बैठक घेऊन त्यांना थकीत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते, हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)
दंडाच्या रकमेमध्ये वाढ
By admin | Published: July 27, 2014 1:25 AM