सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला २८ दिवसाचा कालावधी होत असताना अपेक्षेच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळत आहे. यातच बाधितांची संख्या कमी होत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. धक्कादायक म्हणजे, मागील दोन महिन्यात ६१ वर्षांवरील वयोगटात मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मेडिकलमध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या १७४ मृत्यूपैकी ८२ रुग्ण या वयोगटातील होते.
जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग धरला. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित व मृत्यूच्या संख्येची विक्रमी नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा जोर कमी होऊ लागला. परंतु मागील चार महिन्यात दैनंदिन रुग्णांची संख्या २५० ते ३५० दरम्यान दिसून येत आहे. ही संख्या कमी होत नसल्याने नुकतेच केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली. यातच पूर्वी ५० च्या आत दिसणारी मृत्यूची संख्या मागील दोन महिन्यात ६१ व त्यावरील वयोगटात वाढल्याचे दिसून येत आहे. मेडिकलमध्ये डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या एकूण ९९ मृत्यूमध्ये ४२ तर, जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या एकूण ७५ मृत्यूमध्ये ४० मृत्यू याच वयोगटातील आहेत. यामागे वाढत्या वयासोबतच अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग तसेच फुफ्फुसांचे आजार कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-डिसेंबर महिन्यात ४२ टक्के मृत्यू
डिसेंबर महिन्यात मेडिकलमध्ये १ ते २० वयोगटात २, २१ ते ४० वयोगटात १९, ४१ ते ६० वयोगटात ३६ तर ६१ आणि त्यापुढील वयोगटात ४२ मृत्यू झाले. एकूण मृत्यूसंख्येच्या तुलनेत ६१ वर्षांवरील वयोगटात ४२ टक्के मृत्यूची नोंद झाली.
-जानेवारी महिन्यात ५३ टक्के मृत्यू
जाोवारी महिन्यात १ ते २० वयोगटात शून्य, २१ ते ४० वयोगटात ८, ४१ ते ६० वयोगटात २७ तर ६१ व त्यापुढील वयोगटात ४० मृत्यूची नोंद झाली. एकूण मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५३.३३ टक्के मृत्यू ६१ वर्षांवरील वयोगटात झाले आहेत.
-गाफील राहू नका ()
शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आहे. परंतु गाफील राहू नका. कोरोनाचे संकट टळलेले नाही. विशेषत: ६० वरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, चेहऱ्याला हात न लावणे व वारंवार हात धूत राहणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. याशिवाय, घरी आणल्या जाणाऱ्या भाज्या, दुधाची पिशवी स्वच्छ धुवूनच वापरा. घरकाम करणाऱ्यांना कोरोना नियमाचे पालन करण्यास सांगा.
-डॉ. प्रशांत पाटील
प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग
दोन महिन्यातील मृत्यूची स्थिती
-डिसेंबर २०२०
वयोगट मृत्यू
१ ते २० ०२
२१ ते ४० १९
४१ ते ६० ३६
६१ ते त्यापुढे ४२
-जानेवारी २०२१
वयोगट मृत्यू
१ ते २० ००
२१ ते ४० ०८
४१ ते ६० २७
६० ते त्यापुढे ४०