नरखेड : नरखेड तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्यात कोरानाप्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, चाचण्यांचे प्रमाण वाढावे तसेच रुग्णाच्या कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी तालुका प्रशासनाला दिले.
नरखेड तालुक्यातील कोरोना संक्रमण परिस्थितीचा ठाकरे यांनी पंचायत समिती सभागृहाच्या बैठकीत आढावा घेतला. बैठकीत तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या विविध घटकांवर चर्चा करण्यात आली. तालुका प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून सध्या सुरू असलेल्या कारवाईची माहिती घेण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य अधीक्षक, रुग्ण स्ट्रेसिंग टीम, कोविड कंट्रोल रूम, कोविड केअर सेंटर याच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेण्यात आली. या कामामध्ये कुठेही समन्वय आढळून आला नसल्याची माहिती आहे. बैठकीला उपस्थित पोलीस पाटील यांनाही त्याच्या गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पार्श्वभूमी विचारण्यात आली. त्यानुसार प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. सुपर स्प्रेडर चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
कोविड कंट्रोल रूमने पोस्टमनची भूमिका न बजावता कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. कॉन्टक्ट ट्रेसिंग टीममध्ये पोलीस पाटलांचाही समावेश करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यासोबतच ६० वर्षांवरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार डी.जी. जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, नायब तहसीलदार संजय डांगोरे, भागवत पाटील, नरखेड न.प.चे मुख्याधिकारी प्रवीण मानकर, मोवाड न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत, आरोग्य अधीक्षक डॉ. दत्तात्रय वनकडस, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांच्यासह महसूल व आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.