बाबा टेकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : मजुरांची कमतरता आणि कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमतींमुळे कपासाचा उत्पादनखर्च वाढला आहे. तुलनेत भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी ताेटाच पडताे. सावनेर तालुक्यात कपाशीची माेठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून केंद्र शासनाने बंदी घातलेल्या कपाशीच्या ‘एचटीबीटी’ वाणास प्रथम पसंती देत माेठ्या प्रमाणात लागवड करीत आहेत. या वाणास शासनाची अधिकृत मान्यता नसल्याने फसवणूक हाेण्याची शक्यता असली तरी शेतकरी शासनाची बंदी झुगारून या वाणावर विश्वास ठेवत आहे.
या बियाण्याच्या पॅकेटवर तांत्रिक बाबींचा फारसा उल्लेख नसताे. हे बियाणे प्रतिपॅकेट (४५० ग्रॅम) ८०० ते ९०० रुपयांत विकले जाते. या बियाण्यांची उगवणक्षमता किमान ९० टक्के असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली असून, काहींनी ती ६५ टक्के असल्याचे सांगितले. हे बियाणे मुख्यत: मध्यप्रदेशातून सावनेर तालुक्यात आणले जाते. सर्वांचे एकाचवेळी निंदण येत असल्याने निंदणाला मजूर मिळत नाही. मिळाल्यास चढी मजुरी द्यावी लागते. निंदणास विलंब झाला तर पिकाची वाढ खुंटण्याची शक्यता असते. या वाणावर तणनाशक फवारता येत असल्याने खर्च कमी हाेताे. शिवाय, कापसाचे उत्पादनही चांगले हाेते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. काहींनी उत्पादनात घट येत असल्याचे सांगितले.
...
किमान पाच हजार पॅकेटची विक्री
केळवद (ता. सावनेर) परिसरात यंदा एचटीबीटी वाणाचे किमान पाच हजार पॅकेट विकण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. हत्तीसरा (ता. सावनेर) गावात शेतकऱ्यांनी ५०० पॅकेट बियाण्याची लागवड केली आहे. यात फसवणूक झाली तरी शेतकरी कुणाकडे दाद मागत नाही. अधिकृत बियाणे बाेगस निघाल्यास शासन व प्रशासन फारसी मदत करीत नाही. बियाणे उत्पादक कंपन्या नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करते. न्यायालयील लढाई लढण्यास पैसा व वेळ नसताे. त्यामुळे आपल्याला अधिकृत व अनधिकृत याबाबत काहीही घेणे-देणे नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
...
११,१०० पॅकेट जप्त
कृषी विभागाने केळवद पाेलिसांच्या मदतीने मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या खुर्सापार परिसरात २६ मे राेजी कारवाई करीत प्रतिबंधित एचटीबीटी कपाशीच्या बियाण्याचे ११,११० पॅकेट जप्त केले. या बियाण्याची एकूण किंमत १ काेटी ५ लाख १३ हजार ७०० रुपये हाेती. हे बियाणे ट्रकने मध्यप्रदेशातून नागपूर जिल्ह्यात विक्रीसाठी आणले जात हाेते.
...
शासनाचा दावा चुकीचा
एचटीबीटी हे जीएम (जेनेटिकली माॅडिफाइड) बियाणे आहे. हे बियाणे मानवी आराेग्य व पर्यावरणास हानिकारक असल्याचा दावा केंद्र व राज्य शासन, तसेच राजकीय नेते करीत आहेत. हे बियाणे हानिकारक कसे आहे, हे मात्र प्रयाेगशाळेचा अहवाल सादर करून कुणीही सिद्ध करायला तयार नाही. हे वाण बाेंडअळी प्रतिबंधक असल्याने फवारणीचा खर्च कमी हाेताे. जीएम बियाणे सर्वांच्या फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी या बियाण्याला शासनाने अधिकृत परवानगी देणे आवश्यक आहे.
-मदन कामडे, शेतकरी नेते