लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील निर्यातदारांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन निर्यात वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. केंद्राने पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्यात वाढीनेच अर्थव्यवस्था मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन मिहानचे विकास आयुक्त आणि अतिरिक्त डीजीएफटी जयकरण सिंह यांनी येथे केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे (व्हीआयए) निर्यात धोरणावर सिव्हील लाईन्स येथील उद्योग भवनात आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, उपाध्यक्ष आदित्य सराफ, व्हीआयए एक्झिम फोरमचे अध्यक्ष प्रतिक तापडिया, सचिव गौरव सारडा उपस्थित होते.जयकरण सिंह म्हणाले, केंद्र सरकारतर्फे निर्यात धोरणांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहे. याचप्रकारे ‘निर्यात बंधू’ योजना सुरू आहे. त्याची समीक्षा करण्यात येत आहे. विदर्भातील उद्योजक आणि व्यापारी या योजनेचा लाभ घेऊन स्वत:ला सक्षम बनविण्यासाठी विभागाची मदत घेऊ शकतात. त्या माध्यमातून निर्यात वाढविता शक्य होणार आहे. ते म्हणाले, विदर्भात निर्यातीच्या अपार संधी आहेत. एक हजारापेक्षा जास्त लोक आयात-निर्यात व्यवसायात आहेत. ही संख्या वाढविण्याची गरज आहे. याकरिता नवीन गुंतवणूक आकर्षित करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मिहान प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे. त्याचा लाभ उद्योजकांना मिळणार आहे. येथे पायाभूत सुविधा तयार आहेत. कंपन्यांना आकर्षित करण्याची गरज असल्याचे सिंह म्हणाले.उपडीजीएफटी डॉ. दिराज दाभोळे यांनी केंद्राने सुरू केलेल्या निर्यात बंधू योजनेची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, विदेशी व्यापार धोरणांतर्गत उद्योगांना इन्सेन्टिव्ह आणि सबसिडी मिळविण्याच्या संधी आहे. कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत करण्यात येत आहे.प्रारंभी सुरेश राठी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन आणि आभार गौरव सारडा यांनी मानले. यावेळी असोसिएशनचे सदस्य, निर्यातदार, आयातदार आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्यात वाढवा, अर्थव्यवस्था मजबूत करा : जयकरण सिंह यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:58 PM
केंद्राने पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्यात वाढीनेच अर्थव्यवस्था मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन मिहानचे विकास आयुक्त आणि अतिरिक्त डीजीएफटी जयकरण सिंह यांनी येथे केले.
ठळक मुद्दे व्हीआयएतर्फे आयोजन