मनपाला आली जाग : आरोग्य सभापतींनी केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापलिकेच्या रुग्णालयातील असुविधांबाबत गेल्या काही दिवसांपासून लोकमतने वृत्त मालिका चालवली आहे. यामुळे मनपा प्रशासनाला जाग आली असून शुक्रवारी मनपा आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले यांच्या नेतृत्वात एका चमूने मनपाच्या इंदिरा गांधी रोगनिदान रुग्णालयाची पाहणी केली आणि रुग्णालयात तातडीने सुविधा वाढवा, असे निर्देश दिले. महापालिका रुग्णालयांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. यांदर्भात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘मनपा रुग्णालये आॅक्सिजनवर’ या शिर्षकांतर्गत वृत्तमालिका सुरू केली आहे. आतापर्यंत तब्बल १५ भाग छापून झाले आहेत. अजूनही ही वृत्तमालिका सुरूच आहे. महापालिकेचे सर्वात मोठ्या रुग्णालयापैकी एक असलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयातून या वृत्त मालिकेची सुरुवात करण्यात आली. हे रुग्णालय चांगल्या रुग्णालयापैकी एक समजले जात होते. परंतु ते आता राहिले नाही. डॉक्टर वेळेवर येत नाही. औषधे उपलब्ध होत नाहीत. बायोमेट्रिक मशीनचा वापर होत नाही. आदी अनेक त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत आरोग्य समितीचे सभापती चाफले यांच्या नेतृत्वातील चमूने आज शुक्रवारी इंदिरा गांधी रुग्णलयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती प्रमोद कौरती, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, झोन अधिकारी रोहिदास राठोड, डॉ. विजय तिवारी, राजेश हाथीबेड आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य समितीने येथील डॉक्टरांशी चर्चा केली. रुग्णालयाची पाहणी केली. येथील महिला प्रशिक्षण केंद्राचीही पाहणी केली. तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत बऱ्याच तक्रारी असून रुग्णालयातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.
रुग्णालयात तातडीने सुविधा वाढवा
By admin | Published: May 13, 2017 2:39 AM