मोरेश्वर मानापुरे, नागपूर : सणासुदीच्या दिवसांत मुख्यत्वे दिवाळीत भेसळीचे प्रकार घडतात. भेसळीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दुध व दुग्धजन्य पदार्थ, खोवा, तूप, मिठाई, नमकीन, फरसाण, रवा, मैदा, खाद्यतेल, बेसन, ड्रायफ्रुटस, चॉकलेट आदी पदार्थांचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठविले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त कृष्णा जयपुरकर यांनी सांगितले.
काही असामाजिक तत्त्वे सणांमध्ये जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून आणि अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवणुक व विक्री करण्याची दाट शक्यता असते. सणासुदीत जनतेस सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याची विभागाची जबाबदारी आहे.
दिवाळीनिमित्त मिठाई आणि खव्यापासून तयार केलेल्या पदार्थांना मोठी मागणी असते. परंतु जिल्ह्यात तुलनात्मकरीत्या दुध आणि मिठाईसाठी खवा उपलब्ध होऊ शकत नाही. साहजिकच अधिक नफ्याच्या उद्देशाने भेसळ केली जाते. त्यासाठी कृत्रिम, अस्वच्छ व निकृष्ट दर्जाचा खवा बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. गोणपाटात, प्लास्टिक किंवा पाल्यात गुंडाळून खवा बाजारात पाठवला जातो. या मिठाईत अजिनोमोटो, इसेन्स आणि कृत्रिम रंग मिसळले जातात. या निकृष्ट खव्यातून स्वस्तात मिठाई तयार करायची व आकर्षक पॅकिंगमधून ग्राहकांच्या घशात उतरवायची, असा धंदा काही ठिकाणी सुरू झाला आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने आता मिठाईवर पॅकिंगची तारीख आणि मुदत टाकणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे मिठाई बॉक्सवर पॅकिंग, निर्मितीनंतरच्या पंधरा-वीस दिवसांच्या तारखा टाकून ती बाजारात आणली जाते. आकर्षक रंगबिरंगी मिठाई, फास्टफूड, नमकिनची मोठी आवक बाजारात होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दिवाळी सणानिमित्त तपासणी मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे. ग्राहकांनी अन्न पदार्थांची खरेदी करताना त्यावरील उत्पादन तारीख व बेस्ट बिफोर तारीख पाहुनच खरेदी करावी. काही चुकीचे वा आक्षेपार्ह आढळुन आल्यास अन्न व औषध प्रशासनच्या नागपूर कार्यालयात २५६२२०४ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी, असे जयपुरकर यांनी म्हटले आहे.
पदार्थाचे नाव नमुन्यांची संख्या :घी/वनस्पती १०खवा/मावा ०५मिठाई ३८नमकीन/फरसाण ०२खाद्यतेल ४७मैदा, रवा, बेसन, आटा, ड्रायफ्रुट व तत्सम अन्न पदार्थ १६