नरेश डोंगरे !नागपूर : सावज टिपण्यासाठी चाैकाचाैकात आडोशाला उभे राहून 'वसुलीभाईं'ची भूमीका वठविणारे वाहतूक शाखेचे पोलीसही उपराजधानीतील गुन्हेगारी वाढविण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा खुद्द पोलीस दलातच केली जात आहे. गुन्हेगार शस्त्र घेऊन बिनधास्त शहरातून फिरत असताना वाहतूक पोलीस मात्र तटस्थ भूमिकेत राहतात. त्यांनी दुचाकीचालकांचे लायसन्स तपासण्यासोबतच संशयितांची झडती घेतल्यास हत्या, हत्येचे प्रयत्न, यासारखे अनेक गंभीर गुन्हे टळू शकतात, असा सूरही आता उमटू लागला आहे.
शहरातील शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून 'क्राईम कंट्रोल'साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. मात्र, नेत्यांनी 'क्राईम कॅपिटल'चा ठपका ठेवलेल्या नागपूर शहरातील गुन्हेगारी थांबायला तयार नाही. ती वारंवार उफाळून येत आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार नागपुरात आले असताना वाडीत दोघांची हत्या करून गुन्हेगारांनी राज्यकर्त्यांना हिंसक सलामी दिली. त्यानंतर सरकार असेपर्यंत कोतुलवारची हत्या अन् हत्येच्या प्रयत्नाच्या घटना घडतच राहिल्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचपावलीत राजेश विनोद मेश्राम नामक तरुणाची हत्या झाली. दोन दिवसांपूर्वी कळमन्यात झालेल्या हत्येच्या घटनेची शाई वाळत नाही तोच आता पुन्हा कुख्यात घनचक्करने अविनाश जुमडे नामक गुन्हेगाराची हत्या केली. हत्येच्या या घटना सर्वसामान्यांच्या काळजात धडकी भरविणाऱ्या आहेत.
गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा केला जात असला तरी गुन्हेगार मात्र अनियंत्रित असल्याचे वास्तव यातून उघड होत आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, गुन्हेगार बिनधास्त रस्त्याने घातक शस्त्रे घेऊन फिरत असताना पोलिसांना ते का दिसत नाही, असाही प्रश्न चर्चेला आला आहे. या प्रश्नामुळे गस्तीवर असणाऱ्या तसेच चाैकाचाैकात उभे राहणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यावर, सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील कोणत्याही वर्दळीच्या भागात फिरल्यास टपोरी टाईपचे तरुण बिनधोक ट्रिपल सिट फिरताना दिसतात. चाैकाचाैकात सिग्नल तोडणाऱ्या सावजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी कर्तव्यनिष्ठता दाखवून त्यांची झाडाझडती घेतल्यास शहरात रोज अनेक शस्त्रधारी गुन्हेगारांची मानगुट पकडण्यास मदत होऊ शकते. मात्र, गुन्हेगारांना पकडण्याची आपली जबाबदारी नाही, असा वाहतूक पोलिसांचा अविर्भाव असतो. त्यामुळे शस्त्र घेऊन फिरणारे गुन्हेगार गाडीचा कट लागल्यामुळे किंवा रागाने पाहिल्याचे क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यावर निर्दोष व्यक्तीची हत्या करताना दिसत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा हा जीवघेणा तटस्थपणा आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीतही चर्चेला आला होता, हे विशेष !
ईन्स्टाग्रामवर चाकू अपलोड -कळमन्यातील हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने दोन महिन्यापूर्वी त्याच्या ईन्स्टाग्राम अकाउंटवर चाकूचा फोटो अपलोड केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. शहरातील कोणत्याच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला गुन्हा घडण्यापूर्वी हे दिसले नाही, ही दुसरी एक धक्कादायक बाब ठरावी.