नागपूर : पेट्रोल आणि डिझेलची महागाई आता स्वयंपाकघरात पोहोचली आहे. मालवाहतुकीच्या दरवाढीसह भाज्यांचेही दर वाढले आहेत. भाज्यांची सर्वाधिक आवक नागपूर जिल्ह्याबाहेरून आणि अन्य राज्यांतून होत असल्यामुळे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. पाच दिवसांपूर्वी होलसेलमध्ये ६० रुपयांवर गेलेले टोमॅटोचे दर आता ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत; पण दर्जा घसरला आहे. किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये किलो भाव आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत.
किरकोळमध्ये बहुतांश भाज्यांचे भाव ५० ते ६० रुपये किलो आहेत. होलसेलमध्ये भाव वाढल्याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून येत आहे. सिलिंडरचे दर वाढल्यामुळे घराचे बजेट बिघडले आहे. आता भाज्या महाग झाल्यामुळे घर कसे सांभाळायचे, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
गरीब आणि मध्यमवर्गीयांवर आर्थिक बोजा
जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेल, सिलिंडर आणि अन्य वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने भर टाकली आहे. भाज्यांच्या किमतीने आर्थिक बोजा वाढला आहे. हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे भाव ८० रुपयांवर पोहोचले आहेत. केवळ वांगे, पत्ता कोबी, भेंडी, कोहळे, लवकीचे भाव कमी आहेत. जून महिन्यापर्यंत जास्त भावात भाज्या खरेदी कराव्या लागतील, असे कॉटन मार्केटचे व्यापारी राम महाजन यांनी सांगितले.
महाजन म्हणाले, नागपूर शहरालगतच्या शेतीत भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून केवळ ३० टक्के भाज्यांची आवक आहे. डिझेलचा भाव वाढल्यामुळे भाज्यांच्या किमतीवर आणि दर्जावर परिणाम झाला आहे. कोथिंबीर नांदेड, पंढरपूर आणि मध्यप्रदेशचा काही भाग, हिरवी मिरची बुलडाणा, मौदा, टोमॅटो बरेली, जयपूर आणि वांगे मुलताई येथून येत आहे.