नागपूर: उन्हाचा तडाखा वाढल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या गारेगार कलिंगडांच्या (टरबूज) मागणीसह किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार एक किलो कलिंगडचे भाव २० ते ३० रुपये किलो आहे.
महात्मा फुले मार्केट आणि कळमना बाजार समिती मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात दररोज जवळपास दहा हजार नग कलिंगडांची आवक होते. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमधून या दोन्ही बाजारपेठांमध्ये कलिंगड विक्रीस येतात.
शेतकऱ्यांकडून कलिंगडची थेट विक्रीभंडारा, यवतमाळ, गोंदिया जिल्हा आणि पांढरकवडा तालुक्यातून कलिंगडाची सर्वाधिक आवक होत आहे. उमरेड आणि भंडारा मार्गावर शेतकऱ्यांकडून थेट विक्री करण्यात येत असल्याचे दिसत आहे. थेट विक्रीतून शेतकऱ्यांना जास्त नफा होतो. यंदा मार्चपासूनच उन्हाचा तडाखा बसल्यामुळे कलिंगडाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे मार्चपासूनच आवक वाढली. कलिंगडचा हंगाम दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतो. उन्हाच्या तडाख्यामुळे ज्यूस सेंटर चालक आणि फळ विक्रेत्यांकडून कलिंगडांच्या मागणीत वाढ झाली आहे.