योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीत अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच महिला अत्याचार व विनयभंगांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. २०२३ मधील पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत यंदा महिला अत्याचार २१.३७ टक्क्यांनी वाढले आहेत. जर आकडेवारीची सरासरी काढली तर यंदा महिन्याला सरासरी पाच अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. ही आकडेवारी महिला सुरक्षेचे दावे करणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारी आहे.
‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत नागपुरात महिला अत्याचाराच्या १५९ घटनांची नोंद झाली. दर महिन्याला अत्याचारांची सरासरी ही २६ इतकी होती. २०२३ मध्ये वर्षभरात महिला अत्याचाराच्या २६३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर पहिल्या सहा महिन्यांत १३१ घटना घडल्या होत्या व दर महिन्याची सरासरी २१ इतकी होती. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी हे परिचयातीलच व्यक्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये १२२ जणांना अटक करण्यात आली. यात दोन महिलांचादेखील समावेश होता हे विशेष.
- रस्त्याने जाणे ‘सेफ’ आहे का?नागपुरात भर रस्त्यांवर होणाऱ्या विनयभंगाच्या घटना हादेखील मोठा चिंतेचा विषय आहे. मागील वर्षभरात विनयभंगाच्या ५०६ घटनांची नोंद झाली होती व जानेवारी ते जून २०२३ या कालावधीत २५२ गुन्हे झाले होते. विधिमंडळात यावरून विरोधकांनी प्रश्नदेखील उपस्थित केले होते. यावर्षी हाच आकडा २४० इतका असून पोलिसांकडून विविध उपक्रम राबविल्यानंतरदेखील या घटनांमध्ये फारशी कमी झालेली नाही. यंदा दर महिन्याला विनयभंगाचे सरासरी ४० गुन्हे नोंदविले गेले.
कौटुंबिक हिंसाचाराचा ‘व्हायरस’ कायम, महिलादेखील आरोपीविविध माध्यमांतून हुंडा व कुटुंबातील महिला छळवणुकीबाबत जागृती झाल्यानंतरदेखील समाजामध्ये अद्यापही ही कीड कायम आहे. सहा महिन्यांत भारतीय दंड विधानच्या कलम ४९८ (अ) अंतर्गत १४१ गुन्ह्यांची नोंद झाली. यात ८५ जणांविरोधात कारवाई झाली. आरोपींमध्ये १९ महिलांचादेखील समावेश होता. मागील वर्षभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या २८२ घटना झाल्या होत्या.
महिनानिहाय गुन्हे (अत्याचार)महिना : २०२४ : २०२३जानेवारी : २६ : २०फेब्रुवारी : २१ : १४मार्च : २८ : १८एप्रिल : २७ : २६मे : २५ : ३०जून : ३२ : २३
महिनानिहाय गुन्हे (विनयभंग)महिना : २०२४ : २०२३जानेवारी : ४२ : ४२फेब्रुवारी : ४० : ३५मार्च : ३३ : ४७एप्रिल : ३९ : ३९मे : ४८ : ४७जून : ३८ : ४२