स्थायी समितीचे बाजार व जाहिरात विभागाला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकीत शुल्कासह आर्थिक वर्षातील शुल्क वसुली करून उत्पन्न वाढविण्याचे निर्देश सोमवारी बैठकीत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी बाजार व जाहिरात विभागाला दिले.
मनपाच्या दहाही झोनमध्ये बाजार विभागाद्वारे २६९२ दुकाने, ९५६ ओटे, ११७७ अस्थायी जागा असे एकूण ४८२५ मालमत्ता परवान्यावर वाटप करण्यात आलेल्या आहेत. या सर्व मालमत्तांमधून बाजार विभागाला २०२०-२१ या वर्षात १४ कोटी ८० लाख रुपये उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ८ कोटी ३ लाख प्राप्त झाले होते. २०२१-२२ मध्ये १० कोटी ६० लक्ष एवढे उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्ट कमी असूनही अपेक्षित वसुली नाही. यावर नाराजी व्यक्त करून उत्पन्न वाढीकडे विशेष लक्ष द्या, असे निर्देश भोयर यांनी दिले. यावेळी उपायुक्त विजय देशमुख, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, आदी उपस्थित होते.
जाहिरात विभागाद्वारे शहरातील होर्डिंग, फुटपाथवरील बॅनर स्टँड, विद्युत खांब, आदींवर होणाऱ्या जाहिरातीतून ६.९० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याची माहिती मिलिंद मेश्राम यांनी दिली. काही जाहिरात स्थळांवरील प्रलंबित उत्पन्नासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश भोयर यांनी दिले.