नागपूर : कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये खाटांची संख्या वाढविण्यासह लसीकरण मोहिमेला प्राथमिकता देऊन गती वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दिले. राज्यात हॉस्पिलमध्ये होणा-या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हॉस्पिटलला फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचेही निर्देश दिले.
पालकमंत्री शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झालेल्या समीक्षा बैठकीत बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.
राऊत म्हणाले, जिल्ह्यात दररोज ७ हजार नवे रुग्ण येत आहेत. अशा स्थितीत हॉस्पिटलमध्ये बेड वाढविणे गरजेचे आहे. मानकापूर येथील क्रीडा संकुल व मनपा हॉस्पिटलमध्ये खाटा वाढविण्यावर त्यांनी भर दिला. भिलाई स्टील प्लांट, राऊरकेला व जिल्ह्यातील ११ प्रकल्पातून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. वडेट्टीवार यांनी सर्व हॉस्पिटलला फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट कामांना प्राथमिकता देण्याचे निर्देश दिले.
लसीकरणासाठी शहरात १८७ व ग्रामीणमध्ये १७७ केंद्र
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, शहरात १८७ आणि ग्रामीण भागात १७७ लसीकरण केंद्र आहे. या केंद्रावर वॅक्सिन देण्यात येईल. राऊत यांनी दररोज १ लाख वॅक्सिन देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात निर्देश दिले.
आवश्यक असल्यास रेमडेसिविर द्या
राऊत म्हणाले, जिल्ह्यात १२ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आहे. पण एवढा पुरवठा होत नाही. अशा स्थितीत आवश्यक असल्यास इंजेक्शन देण्यात यावे.
एक हजार ऑक्सिजन कन्सेन्ट्रेटर
ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा पाहता १ हजार ऑक्सिजन कन्सेन्ट्रेटर देण्यात येत आहेत. याप्रकारे एअर सेपरेशन मशीनसुद्धा घेण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.