नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असल्यामुळे नागपूरमधील परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे. करिता, भविष्यातील गरज ओळखून नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये कोरोना खाटांची संख्या तातडीने वाढवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र सरकार, राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्तांना दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान, न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी नागपूरमधील गंभीर परिस्थितीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. गेल्यावर्षी राज्य सरकारने शहरात रोज ३० कोरोना खाटा वाढवल्या जातील आणि ऑक्सिजन खाटांची संख्या १००० केली जाईल, असे न्यायालयाला आश्वासन दिले होते. त्याची किती पूर्तता झाली याची माहिती सरकारला मागण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, सरकारला यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय १२ ऑक्टोबर २०२० रोजी न्यायालयाने एम्समध्ये ५०० अतिरिक्त कोरोना खाटा उपलब्ध करण्याचा आदेश देऊन, याकरिता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केली होती. त्यानुसार, एम्समध्ये ५०० अतिरिक्त कोरोना खाटा उपलब्ध करण्यात आल्या नाही, असेही ॲड. भांडारकर यांनी सांगितले. त्यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. उल्हास औरंगाबादकर यांनी एम्समध्ये सध्या ८० खाटा असून, १९८ अतिरिक्त खाटा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात, अशी माहिती दिली. तसेच यासाठी सरकरची मदत मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. परिणामी, न्यायालयाने विभागीय आयुक्त व एम्सचे संचालक यांनी एकमेकांच्या मदतीने एम्समध्ये एक आठवड्यात १९८ अतिरिक्त खाटा उपलब्ध कराव्यात आणि त्यातील ५० टक्के खाटा ऑक्सिजनच्या ठेवाव्यात, असे निर्देश दिले. तसेच या प्रकरणावर ५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.
-----------------------
मेडिकल-मेयोमध्ये किती खाटा?
मुख्य सरकारी वकील ॲड. केतकी जोशी यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, मेडिकलमध्ये सध्या ६०० कोरोना खाटा आहेत. गुरुवारी त्यातील ३० ऑक्सिजन व १७ आयसीयूसह एकूण १५५ खाटा रिकाम्या होत्या. मेयोमध्ये एकूण ५२२ कोरोना खाटा असून, त्यातील ८५ खाटा रिकाम्या होत्या. त्यात ३० खाटा ऑक्सिजन व २० खाटा आयसीयू होत्या. याशिवाय मेडिकलमध्ये आणखी ४०० ऑक्सिजन खाटा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे काम येत्या दोन आठवड्यात पूर्ण होईल, असे ॲड. जोशी यांनी सांगितले. तसेच शहर व ग्रामीण मिळून एकूण १३५९ कोरोना खाटा आहेत. गुरुवारी त्यातील ७९७ खाटा रिकाम्या होत्या. त्यात ६५८ ऑक्सिजन व १३९ आयसीयू खाटा होत्या. न्यायालयाने या वर्तमान परिस्थितीवर समाधान व्यक्त केले.