आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरी आणि शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही वाढ वर्षभरात तयार झालेल्या पासपोर्टच्या संख्येवरून दिसून येते. सरकारने नियम शिथिल केल्यामुळे पासपोर्टधारकांची संख्या वाढली आहे. नागपूर विभागात दोन वर्षांच्या तुलनेत वर्ष २०१७ मध्ये ६,४५५ पासपोर्ट जास्त तयार झालेत, हे विशेष. नागपूर विभागीय कार्यालय सेमिनरी हिल्स, सीजीओ कॉम्प्लेक्स येथे असून सादिकाबाद येथे पासपोर्ट सेवा केंद्र आहे. आॅगस्ट २०१७ पर्यंत नागपूर विभागात १७ जिल्हे होते. नंतर सोलापूर येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालनाची जबाबदारी पुणे येथील विभागीय पासपोर्ट कार्यालयाकडे सोपविली आहे. आता नागपूर विभागाकडे हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातील ११ जिल्हे आहेत. वर्ष २०१६ मध्ये १,१७,९६० अर्ज आले होते, तर १,१२,२५१ पासपोर्ट जारी केले होते. वर्ष २०१७ मध्ये १,२०,८५७ अर्ज आले आणि १,१८,७०६ पासपोर्ट जारी केले.शिथिल नियमात आता लग्नाच्या प्रमाणपत्राविना दाम्पत्य अर्ज करू शकतो तसेच अनाथ या प्रकरणात जन्मतारखेच्या प्रमाणपत्रासाठी अनाथालयाच्या लेटरहेडवर प्रमुखाने स्वाक्षरी केलेल्या पत्राला ग्राह्य समजण्यात येणार आहे.
पोस्ट आॅफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रवर्धा येथील पोस्ट कार्यालयात पहिले पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच सुरू होणार आहे. पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट आॅफिस विभागाने एकत्रितरीत्या देशात पहिल्या टप्प्यात ६० पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १९१ केंद्र सुरू होणार आहेत. केंद्रात दोन्ही विभागाचे कर्मचारी काम करतात.
तात्काळ योजनेत सुविधाआता तात्काळ योजनेंतर्गत पासपोर्ट अर्जासाठी १८ वा त्यापेक्षा जास्त वय असल्यास आधार कार्डशी संबंधित १२ पैकी कोणत्याही एका प्रमाणपत्राला अर्जासोबत जोडावे लागेल. तर अर्जदार १८ वा त्यापैकी कमी वयाचा असेल तर त्याला आधार कार्डसोबत संबंधित तीनपैकी कोणत्याही एका प्रमाणपत्राला अर्जासोबत जोडावे लागेल. सामान्य योजनेंतर्गत ‘आऊट आॅफ टर्न इश्यू आॅफ फ्रेश पासपोर्ट’ प्रकरणांत दोन्ही प्रकारच्या अर्जदारासाठी उपरोक्त नियम लागू राहील. सामान्य योजनेत अतिरिक्त तात्काळ शुल्क भरावे लागणार नाही. तात्काळ योजनेत पासपोर्ट तीन दिवसात जारी होईल.
पासपोर्ट बनविणाऱ्यांची संख्या वाढलीउच्च शिक्षण आणि नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पासपोर्ट नियम शिथिल झाल्यामुळे संख्याही वाढली आहे. नागपूर विभागीय पासपोर्ट आॅफिसच्या टप्प्यातून पाच जिल्हे हटविण्यात आल्यानंतरही वर्ष २०१७ मध्ये जास्त पासपोर्ट जारी झाले आहेत.- सी. एल. गौतम, विभागीय पासपोर्ट अधिकारी.