लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत कमी संख्येने चाचण्या झाल्या होत्या. दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढली असताना आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे. चाचण्यांच्या तुलनेतील संसर्गदर व बळीसंख्या यातून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
मुंबईत गेल्या ८ दिवसांत अतिशय कमी चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांची एकूण सरासरी ४० हजार ७६० इतकीच आहे. नागपूरची लोकसंख्या ४० लाख असताना तेथे सरासरी २६ हजारांहून अधिक चाचण्या होत आहेत, तर ६८ लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात हीच संख्या २२ हजार इतकी आहे. नागपूरच्या तुलनेत तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत कमी चाचण्या झाल्याने नेमके चित्र लक्षात येणार नाही व त्यामुळे कोरोनाची भविष्यातील स्थिती हाताळणे कठीण होईल. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने १४ ते १८ टक्के असताना आणि राज्याचा संसर्ग दर २५ ते २७ टक्क्यांच्या आसपास राहत असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजिबात परवडणारे नाही, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.
आभासी चित्र उभे करणे अयोग्य
आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्गदर १५ टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्युसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांतसुद्धा आहे, असा दावादेखील फडणवीस यांनी केला आहे.